महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या वृत्तपत्रांना दिलासा द्या ; ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची मागणी
– कोरची येथे तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. २५ : राज्यातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या वृत्तपत्रांना तातडीने दिलासा देण्याची मागणी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या कोरची तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शासकीय जाहिरात दरात 150 टक्के वाढ करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, किमान जाहिरात आकार निश्चित करणे तसेच जाहिरात देयके 30 दिवसांच्या आत अदा करण्याचे मुद्देही मांडण्यात आले आहेत.
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कागद, मुद्रण व इतर खर्चात मोठी वाढ झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन माध्यम क्षेत्राला आधार देणे गरजेचे आहे.
तसेच पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे, पत्रकार पेन्शन योजनेच्या अटी शिथिल करणे या मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
कोरची येथील नायब तहसीलदार महेंद्र मंडागावडे यांच्यामार्फत हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष मधुकर नखाते, सचिव सूरज हेमके, जितेंद्र सहारे, रवी बावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.














