निवेदनं, पत्रं, जनता दरबार… तरीही न्याय नाही, चामोर्शीतील पीडित महिलांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच
— SIT चौकशीची ठाम मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : अगरबत्ती प्रकल्प, ट्रॅक्टर खरेदी-विक्री व चिचडोह बॅरेज जमीन रजिस्ट्री प्रकरणातील कथित फसवणुकीविरोधात पीडित महिला व पुरुषांचे आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली समोर चौथ्या दिवशीही सुरूच आहे. वारंवार निवेदने, पत्रव्यवहार व जनता दरबार गाठूनही न्याय न मिळाल्याने महिलांचा संताप उफाळून आला आहे.
चामोर्शी येथील नगरसेवक आशिष पिपरे व नगरसेविका सोनाली पिपरे यांनी राजकीय दबावतंत्राचा वापर करून गरीब शेतकरी व शेतमजुरांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आंदोलकांनी केले आहेत. २०२० पूर्वी कर्जजप्तीची स्थिती असताना अल्पावधीत अमाप संपत्ती कशी जमवली, असा थेट सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पीडितांनी लेखी तक्रारी, पत्रकार परिषद तसेच नागपूर येथील जनता दरबारात देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही न्याय मागितला मात्र प्रत्यक्ष कारवाई शून्यच असल्याचा आरोप आहे.
अगरबत्ती प्रकरणात बनावट कंपनीचा संशय, ट्रॅक्टर व्यवहारात आर्थिक लूट आणि चिचडोह बॅरेज रजिस्ट्रीत कोऱ्या चेकवर सह्या घेऊन लाखोंची उचलबांगडी झाल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. उपोषणादरम्यान चार महिलांची प्रकृती खालावून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तरीही प्रशासनाची उदासीनता कायम आहे. तात्काळ SIT चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे.














