पतंगाचा खेळ पडणार महागात : नायलॉन मांजा वापरास ५० हजार, विक्रीस २.५ लाख दंड
– हायकोर्टाच्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांची सार्वजनिक सूचना; ५ जानेवारी २०२६ रोजी आक्षेप नोंदवण्याची अंतिम संधी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : नायलॉन मांजामुळे होणारे प्राणघातक अपघात, निष्पाप नागरिकांचे मृत्यू तसेच पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या स्पष्ट निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यात नायलॉन मांजाविरोधात कठोर दंडात्मक कारवाईचे संकेत देणारी सार्वजनिक सूचना जारी केली आहे.
राज्यात नायलॉन मांजावर बंदी असतानाही अनेक ठिकाणी त्याचा सर्रास वापर व विक्री सुरू असल्याने न्यायालयाने या गंभीर बाबीची दखल घेतली आहे. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून, नायलॉन मांजा वापरणे आता थेट खिशावर घाव ठरणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कोणतीही प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास तिला ५०,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच, एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, संबंधित पालकांना ५०,००० दंड का करू नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. यासोबतच, नायलॉन मांजाचा साठा बाळगणाऱ्या किंवा त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रत्येक उल्लंघनासाठी थेट २,५०,००० रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे.
ही दंडात्मक कारवाई अंतिम करण्यापूर्वी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार जनतेला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. ज्यांना या प्रस्तावित कारवाईविरोधात आक्षेप किंवा निवेदन सादर करायचे आहे, त्यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुनावणीला कोणीही उपस्थित राहिले नाही, तर या दंडात्मक कारवाईस जनतेचा कोणताही आक्षेप नाही, असे मानले जाईल.
दरम्यान, नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी असतानाही त्याचा वापर किंवा विक्री केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर व आर्थिक कारवाई करण्यात येईल, असा ठाम इशारा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नायलॉन मांजाचा वापर टाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #NylonManja #NylonManjaBan
#KiteFlyingSafety #KiteManjaPenalty #HighCourtOrder #PublicSafety #BirdProtection
#SaveBirds #IllegalManja #StrictAction #DistrictAdministration #GadchiroliNews #MaharashtraNews #LawAndOrder #PublicAwareness
#SafetyFirst #NoToNylonManja














