अभाविप ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन : गडचिरोली जिल्ह्यात लघुनिधी संकलनाला उस्फूर्त प्रतिसाद

58

अभाविप ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन : गडचिरोली जिल्ह्यात लघुनिधी संकलनाला उस्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांताचे आगामी ५४ वे प्रांत अधिवेशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या लघुनिधी संकलन उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविल्याने विद्यार्थी परिषदेच्या कार्याबाबत समाजात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागांमध्ये परिषद कार्यकर्त्यांनी घरोघरी, दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष भेटी देत अधिवेशनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले. यावेळी शिक्षणव्यवस्थेतील आव्हाने, विद्यार्थ्यांचे हक्क, ग्रामीण व आदिवासी भागातील शैक्षणिक प्रश्न तसेच राष्ट्रनिर्मितीतील विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत नागरिकांशी सखोल संवाद साधण्यात आला.
या लघुनिधी संकलन उपक्रमाच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रहिताच्या कार्याची व्यापक माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. अनेक नागरिकांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्याची दखल घेत आर्थिक सहकार्य करत अधिवेशनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या, तर अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान देत सक्रिय सहभाग नोंदविला.
आगामी ५४ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनात नवीन शैक्षणिक धोरण, विद्यार्थी प्रश्न, रोजगाराच्या संधी, संशोधन व तंत्रज्ञान, तसेच ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा होणार आहे. या अधिवेशनातून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने या उपक्रमास सहकार्य करणारे सर्व दानशूर नागरिक, व्यापारी वर्ग, युवक व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून, समाजाच्या भक्कम पाठबळावर हे प्रांत अधिवेशन भव्य, यशस्वी व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here