चकमकीत तीन नक्षली ठार : एका महिला नक्षलीचा समावेश
– घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा व नक्षली साहित्य जप्त
The गडविश्व
सुकमा / विशेष प्रतिनिधी, दि. १९ : जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षाबलांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा राखीव दलाच्या (DRG) जवानांशी झालेल्या चकमकीत २ एरिया कमिटी मेंबर (ACM) आणि एका महिला नक्षलीसह एकूण ३ इनामी नक्षली ठार झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलींवर एकूण १२ लाख रुपयांचे इनामी असून कोंटा–किस्टाराम परिसरात दीर्घकाळ सक्रिय होते.
नक्षल संघटनेच्या PLGA बटालियन क्रमांक १ चा कमांडर देवा याच्या शोधासाठी DRG पथकाने शुक्रवारी सकाळी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. याच दरम्यान सकाळी गोलापल्ली पोलीस ठाणे हद्दीतील गोंदीगुडा येथील जंगल व डोंगराळ भागात चकमक उडाली.
या चकमकीत माडवी जोगा उर्फ मुन्ना (जि. नारायणपूर) – ACM, कोंटा एरिया कमिटी (५ लाख इनाम), सोढी बंडी, सिंगनमडगू, किस्टाराम (सुकमा) – ACM, किस्टाराम एरिया कमिटी (५ लाख इनाम) तसेच नुप्पो बजनी, टेकलगुडा, जगरगुंडा (सुकमा) – LOS सदस्य, किस्टाराम एरिया कमिटी (२ लाख इनाम) हे नक्षली ठार झाले.
चकमकीनंतर घटनास्थळाची झडती घेतली असता ९ एमएम सर्व्हिस पिस्तूल, १२ बोर भरमार बंदूक, बीजीएल सेल, टिफिन बॉम्ब, मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य तसेच नक्षली कागदपत्रे जप्त करण्यात आली. ठार नक्षल्यांकडून शस्त्रसाठा व नक्षली साहित्य सुरक्षाबळांनी ताब्यात घेतले आहे.
या कारवाईमुळे किस्टाराम व कोंटा परिसरातील नक्षली हालचालींना मोठा धक्का बसला असून, सुरक्षाबळांचा नक्षलविरोधी दबाव अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews
#NaxalEncounter #SukmaNews #DRGAction #AntiNaxalOperation #ChhattisgarhNews #BastarNews #MaoistEncounter #PoliceAction #InternalSecurity #TheGadvishva














