मुख्यमंत्री श्रमृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मौशिखांब येथे आयुष्मान कार्ड व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

49

मुख्यमंत्री श्रमृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मौशिखांब येथे आयुष्मान कार्ड व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १७ : मुख्यमंत्री श्रमृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीअंतर्गत १५ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब येथे ग्राम पंचायत मौशिखांब व प्राथमिक आरोग्य केंद्र अमीर्झा यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्राम पंचायत मौशिखांबच्या सभागृहात पार पडलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवून १०० टक्के आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा ठाम संकल्प ग्रामपंचायतीने यावेळी अधोरेखित केला. शिबिराचे आयोजन ग्राम पंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच रंजिता पेंदाम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच रुपाली गंधारवार, ग्राम पंचायत सदस्य विकास उंडीरवाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सयाम, वैज्ञानिक अधिकारी वसंत पोरेटी, औषधी निर्माता अधिकारी जगदीश सिडाम, आरोग्य सहाय्यक पी. के. कवाडकर व पी. एस. बरडे यांची उपस्थिती होती.
आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व आरोग्य तपासणीचे काम डॉ. गोनाडे, डॉ. घोडाम, डॉ. मंडल, डॉ. केवाटे, सीएचओ जुवारे, मोहाड, देव्हारे (मौशिखांब उपकेंद्र), गेडाम, मेश्राम तसेच सातपुते, कोवे, हुल्के, अभिषेक मडावी व अमर मेश्राम यांनी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडले. आशा वर्कर मंगला जांभूळकर, अल्का कुंघाडकर व गीता चापले यांनी नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या शिबिरात एकूण १३२ नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड नोंदणी पूर्ण करण्यात आली. राशन कार्डमधील त्रुटी व तांत्रिक कारणांमुळे ४१ नागरिकांची नोंदणी प्रलंबित राहिली असून, पुढील शिबिरात ती निश्चित पूर्ण करण्यात येईल, असा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला. यासोबतच नागरिकांची ईसीजी व इतर आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली.
महिला, पुरुष, युवक-युवती तसेच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम पंचायत कर्मचारी नानू ठाकरे, बादल मोंगरकर व प्रतिभा आलम यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिराच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सरपंच रंजिता पेंदाम, उपसरपंच रुपाली गंधारवार व ग्राम पंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांनी आरोग्य विभागाचे आभार मानले. यावेळी बोलताना खुशाल नेवारे यांनी ग्राम पंचायत हद्दीतील गावाचा नियोजनबद्ध व झपाट्याने विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच भविष्यातही नियमित आरोग्य शिबिरे व लोककल्याणकारी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here