शेतकऱ्यांना दिलासा : धान विक्रीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीची संधी
– जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५–२६ मध्ये धान व भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी देण्यात आलेली मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणीची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी नोंदणी झाल्याची बाब लक्षात घेऊन शासनाने ही मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत केली आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मर्यादित, जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या अखत्यारित येणाऱ्या बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या गावाशी संलग्न असलेल्या धान खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन धान विक्रीसाठी आवश्यक ती ऑनलाईन नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, नोंदणीअभावी धान खरेदीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














