ग्रामस्थांच्या उपोषणाने प्रशासन जागे : सोनसरीतील २५ लाख अपहार प्रकरणी चौकशी समिती गठीत
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १७ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी ग्रामपंचायतीतील सुमारे २५ लाख रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणी अखेर प्रशासन जागे झाले आहे. ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे प्रशासनाला तात्काळ पावले उचलावी लागली, परिणामी या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली असून ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले आहे.
आज सकाळी १० वाजता पंचायत समिती, कुरखेडा येथे सोनसरी ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली. महिलांपासून युवक व ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन महिन्यांहून अधिक काळ तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
उपोषणाची गंभीरता लक्षात घेऊन गट विकास अधिकारी धीरज पाटील यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनी तात्काळ निर्णय घेत ४ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत माजी ग्रामसेविका श्रीमती एन. एन. कुमरे यांना पंचायत समिती, कुरखेडा येथे मुख्यालयी हजर राहण्याचे व कोणताही प्रभार न देण्याचे आदेश देण्यात आले.
प्रशासनाकडून ठोस कारवाईची हमी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ‘चौकशी समितीने १० दिवसांत पारदर्शक व निष्पक्ष अहवाल ग्रामसभेसमोर सादर करावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल.’
या प्रकरणात प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले असले, तरी भविष्यात अशा आर्थिक अपहाराच्या प्रकरणांत तात्काळ व कठोर कारवाईची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोनसरीतील या शांततापूर्ण पण ठाम आंदोलनामुळे कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायतींतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे प्रशासन जागे झाले असून, हा लढा ग्रामीण भागातील भ्रष्टाचाराविरोधातील संघर्षाचे ठळक उदाहरण ठरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














