कुरखेडा वनपरिक्षेत्रात बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती मोहीम

52

कुरखेडा वनपरिक्षेत्रात बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती मोहीम
– मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचा पुढाकार
The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. १६ : गडचिरोली जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना, कुरखेडा वनपरिक्षेत्रातील वडेगाव, कुरखेडा व जांभुळखेडा या नियत क्षेत्रांमध्ये वन विभागाच्या वतीने बिबट्यापासून बचाव कसा करावा याबाबत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात नागरिकांना माहितीपूर्ण चित्रफिती दाखवून बिबट्याच्या वावरात सुरक्षितपणे कसे वागावे, तसेच बिबट्याला मानवी वस्तीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी कोणत्या खबरदारी घ्याव्यात, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बिबट्या समोर आल्यास घाबरून पळू नये, स्वतःला मोठे दिसण्यासाठी हात वर करावेत, ओरडावे, तसेच डोळ्यांत डोळे घालून हळूहळू मागे सरकावे, अशा महत्त्वाच्या बचाव उपायांची माहिती देण्यात आली.
याशिवाय घर व परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा उघडा न ठेवणे, रात्री एकटे न फिरता गटाने चालणे, तसेच टॉर्चचा वापर करणे या प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आला. बिबट्या दिसल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले.
हा जनजागृती कार्यक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. गोपुळवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार, वनरक्षक एस. डब्ल्यू. गोन्नाडे (कुरखेडा), एम. के. दुधबळे (वडेगाव), एस. एन. वालदे (जांभुळखेडा) तसेच वनमजूर विकी गोबाडे व विवेक गहाणे यांनी सहकार्य केले.
जंगलप्रधान गडचिरोली जिल्ह्यात बिबट्या व इतर वन्यप्राण्यांमुळे निर्माण होणारा संघर्ष लक्षात घेता, अशा जनजागृती उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे. वन विभागाच्या या पुढाकारामुळे स्थानिक नागरिक अधिक सतर्क राहतील, अनावश्यक धोका टाळता येईल आणि मानव व वन्यजीवांचे सहअस्तित्व शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी वन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here