गडचिरोली हादरले : फ्रिज व सिलेंडर स्फोटात क्षणात घर बेचिराख

293

गडचिरोली हादरले : फ्रिज व सिलेंडर स्फोटात क्षणात घर बेचिराख
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : शहरातील गोकुळनगर परिसरातील नगरपरिषदेच्या सावित्रीबाई फुले शाळेसमोर आज सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेने गडचिरोली शहर हादरून गेले. घरातील फ्रिजमध्ये बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीसाठी मेकॅनिकला पाचारण करण्यात आले असतानाच, मेकॅनिक येण्यापूर्वीच फ्रिजचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात बाजूला असलेल्या गॅस सिलेंडरनेही भडका उडवला आणि काही क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत माया सचिन भानारकर यांचे घर पूर्णतः बेचिराख झाले.
आज शनिवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भानारकर यांच्या घरातील फ्रिजचा दिवा सतत उघडझाप करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर फ्रिजमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानुसार फ्रिज दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकला संपर्क करून बोलावण्यात आले. मात्र, दुरुस्ती होण्याआधीच फ्रिजचा जोरदार स्फोट होऊन घरात आगीने थैमान घातले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
स्फोटाचा आवाज होताच घरातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, फ्रिजच्या स्फोटामुळे जवळच ठेवलेल्या गॅस सिलेंडरला आग लागली आणि सिलेंडरचाही स्फोट झाल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली. आगीच्या भडग्यात घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य, कपडे, फर्निचर यांसह छतावरील कवेलू जळून खाक झाल्या. संपूर्ण घराची राखरांगोळी झाली.
घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
या घटनेत घरमालकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात ठेवलेले ४० हजार रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने आगीत जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे भानारकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कुटुंबीय अक्षरशः उघड्यावर आले आहेत.
या दुर्घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घरगुती विद्युत उपकरणे व गॅस सिलेंडरच्या सुरक्षित वापराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroli #Gadchiroli #GadchiroliNews #FireIncident #HouseFire #Explosion #FridgeExplosion #GasCylinderBlast #MajorFire #BreakingNews #LocalNews #MaharashtraNews #AccidentNews #SafetyAlert #EmergencyResponse

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here