आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पंच परिवर्तना’ ची पंचसूत्री स्वीकारा
– अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : देशातील आदिवासी समाज बांधवांमध्ये जागरूकता निर्माण करणे, मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पंच परिवर्तनाची पंचसूत्री’ स्वीकारावी, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आज गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी ही भूमिका मांडली.
डॉ. होळी यांनी सांगितले की, आपण भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो, परंतु केवळ उत्सव साजरे करून समाजाचा विकास साध्य होणार नाही. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी विचार, कृती आणि परिवर्तनाची आवश्यकता आहे. म्हणूनच पंच परिवर्तनाची पंचसूत्री समाज परिवर्तनाचा शाश्वत मार्ग ठरू शकते. आजही आदिवासी समाजात शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, अडाणीपणा आणि वाईट चालीरीतींचा प्रभाव दिसून येतो. समाजातील काही घटकांनी चांगल्या परंपरांचा विसर टाकून चुकीच्या रूढी आत्मसात केल्या आहेत. त्यामुळे समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी आणि सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी पंच परिवर्तनाची पंचसूत्री समाजात रुजविणे आवश्यक आहे.
पंच परिवर्तनाची पंचसूत्री पुढीलप्रमाणे
– कुटुंब प्रबोधनातून शाश्वत आणि सक्षम निर्माण करणे.
– पर्यावरण व्यक्तीगत पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन.
– सामाजिक समरसतेतून परस्परपूरक जगण्याचा विषय व्हावा आणि स्नेहमय सामाजिक संबंध जोपासणे, सामाजिक व व्यक्तीगत जीवनातील भेदभाव संपविणे.
– नागरी कर्तव्य देशभक्ती बरोबर सामाजिक व नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे.
– स्व-जागृती, स्व-भाषा, स्व-संस्कृती, स्व-देशी, स्वतःच्या परंपरा स्वीकारून त्याला विकसित करणे.
या पंचसूत्रीचा अंगीकार केल्यास आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत सामाजिक, नैतिक आणि मानसिक बदल घडवता येईल. समाजातील चांगल्या परंपरांचा वारसा जपण्यासाठी आणि आत्मनिर्भर समाज घडविण्यासाठी या पंचसूत्रीचा प्रसार गावागावांत आणि प्रत्येक पातळीवर करण्यात येईल. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभर विविध जनजागृती कार्यक्रम राबविणार असून, समाजातील तत्त्वज्ञ, लेखक, इतिहासकार, विचारवंत आणि जागृत घटकांनी या परिवर्तन मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही परिषदेकडून करण्यात आले.
पत्रकार परिषदेला उमेश उईके (जिल्हा महासचिव), सुरज मडावी (जिल्हा सचिव), वामन गुनघरे (जिल्हा उपाध्यक्ष), भूषण अलाने (अध्यक्ष, वडसा), लिना कोकोडे (महिला तालुका अध्यक्ष, गडचिरोली), निलेश आत्राम (शहर अध्यक्ष), पुष्पलता कुमरे (जिल्हा अध्यक्ष महिला शाखा), विधानाई दुग्णा (जिल्हा सचिव महिला शाखा) आणि श्याम सालामे (शहर उपाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देवराव होळी यांनी शेवटी सांगितले की, पंच परिवर्तनाची पंचसूत्री समाजात रुजवूनच आदिवासी समाजाचा शाश्वत विकास आणि देशाच्या सर्वोच्च प्रगतीचा मार्ग खुला होईल. त्यामुळे भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून ही पंचसूत्री प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प परिषदेतून करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice














