– दंडकारण्यात शांततेची नवी पहाट, 153 अत्याधुनिक शस्त्रे जप्त
The गडविश्व
विशेष प्रतिनिधी / बस्तर ( स्वाधिनता बाळेकरमकर), दि. १७ : दंडकारण्याच्या अभेद्य जंगलात आज शांततेची नवी पहाट उगवली आहे. दशकानुदशके नक्षलवादाच्या सावटाखाली जगलेल्या बस्तर विभागात तब्बल 208 माओवादी कार्यकर्त्यांनी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात परतण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या सामूहिक आत्मसमर्पणामुळे बस्तरच्या संघर्षमय इतिहासात नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 110 महिला आणि 98 पुरुष असून, त्यांच्याकडून 153 अत्याधुनिक शस्त्रांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. यात 19 AK-47 रायफल, 17 SLR, 23 INSAS, 1 LMG, 36 .303 रायफल, 4 कार्बाईन, 11 बारेल ग्रेनेड लाँचर (BGL), 41 सिंगल शॉट/12-बोर बंदुका आणि 1 पिस्तूल यांचा समावेश आहे.
या मोठ्या आत्मसमर्पण मोहिमेत संघटनेतील अनेक उच्चपदस्थ सदस्यांनीही सहभाग घेतला आहे. त्यामध्ये एक केंद्रीय समिती सदस्य, चार दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य, एक प्रादेशिक समिती सदस्य, 21 विभागीय समिती सदस्य, 61 क्षेत्रीय समिती सदस्य, 22 PLGA व इतर कादर तसेच 98 पार्टी सदस्यांचा समावेश आहे.
प्रशासनाने याला सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण मोहिमा, विकासकार्य आणि संवाद धोरणाचा परिणाम म्हटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “शासन आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बस्तरमध्ये शांततेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आत्मसमर्पित माओवादींना पुनर्वसन, आर्थिक मदत आणि सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे.”
या आत्मसमर्पणानंतर बस्तर आणि अबूझमाड परिसरातील नक्षल प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, हे दंडकारण्यात बदलाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
दरम्यान, सुरक्षा तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेचे स्वागत करताना मात्र सावध आशावाद व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “शांततेची प्रक्रिया टिकवायची असेल, तर आदिवासी हक्क, रोजगार, जमीन आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे आवश्यक आहे.”
दशकानुदशके लाल विचारांच्या सावलीत झाकोळलेला बस्तर आज नव्या उषःकाळाचे स्वागत करीत आहे. 208 माओवादींनी बंदुका खाली ठेवल्याने दंडकारण्याच्या इतिहासात ‘शांततेचा दिवस’ म्हणून १७ ऑक्टोबरची तारीख कोरली गेली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Bastar #NaxaliteSurrender #Dandakaranya #Chhattisgarh #SecurityForces #PeaceProcess #Rehabilitation #IndianPolice #AntiNaxalOperation #BastarNews #MaoistSurrender #CentralIndia #DevelopmentInBastar #WomenCadres #INSAS #AK47 #BGL #SLR #PeaceInDandakaranya #GovernmentInitiative #BreakingNews














