देसाईगंज : दारु सेवनास विरोध केल्याने युवकावर हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

75

देसाईगंज : दारु सेवनास विरोध केल्याने युवकावर हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल
– सोन्याची चैन हिसकावली
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. ०८ : शहरातील गांधीवार्ड परिसरात दारु सेवनाला विरोध केल्याने एका युवकाला तिघा इसमांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील दोन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी देसाईगंज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येशुदितकुमार चंदू आळे (वय ३३), रा. गांधीवार्ड, देसाईगंज – व्यवसाय ‘यश कोचिंग अकॅडमी’ असे तक्रारदाराचे नाव आहे. ते आपल्या कुटुंबासह देसाईगंज येथे वास्तव्यास असून, वडसा व नागपूर येथे कोचिंग अकॅडमी चालवतात.
३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे २.५० वाजताच्या सुमारास आळे हे आपल्या मित्र आदेश राऊतसोबत घरासमोरून जात असताना, मॉन्टी उर्फ मलिंदरसिंग निर्मलसिंग मक्कड (रा. गांधीवार्ड), बाबू उर्फ अमित अजय नागदिवे (रा. शिवाजीवार्ड) आणि हितेश उर्फ हरिओम दिवाकर नखाते (रा. गांधीवार्ड) हे तिघे रस्त्यावर उघड्यावर दारु पित बसलेले दिसले.
आळे यांनी महिलावर्ग या मार्गाने ये-जा करत असल्याने तेथे दारु सेवन करू नये, असे सांगितल्यावर मॉन्टी मक्कड संतापून शिवीगाळ करत आदेश राऊतच्या पोटात लाथ मारली आणि “हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का?” असा उर्मट प्रश्न केला. त्यानंतर तिघे आरोपी तेथून निघून गेले.
मात्र काही वेळाने, दुपारी अंदाजे ३.२० वाजता आळे आणि आदेश राऊत हे गांधीवार्ड येथील हनुमान मंदिराजवळ पोहोचले असता, तेथे पुन्हा आरोपी तिघे आले. मॉन्टी मक्कडने पुन्हा शिवीगाळ करत “अभी तेरे दोस्त को लाथ मारी थी, अब तुझे देख क्या करता हूं” असे म्हणत आळे यांच्यावर हल्ला चढवला. बाबू नागदिवे याने आळे यांची मान मुरडली, तर हितेश नखाते याने “दादा सरच्या गळ्यात सोन्याची चैन आहे, खिंच के निकाल” असे म्हणत त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची (अंदाजे किंमत १.५० लाख रुपये) सोन्याची चैन हिसकावली.
त्या तिघांनी मिळून आळे व आदेश राऊत यांना हातबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात आळे यांच्या डोळा, तोंड व पायावर दुखापत झाली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने आणि पोलिस पोहोचल्याने आरोपी पळ काढला.
या प्रकरणी आळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मॉन्टी मक्कड, अमित उर्फ बाबू नागदिवे आणि हितेश उर्फ हरिओम नखाते या तिघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, धमकी व चोरीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक देसाईगंज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #desaiganj #देसाईगंज #गडचिरोली #दारुसेवनविरोध #मारहाणप्रकरण #CrimeNews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here