आधार सेवा शुल्कात तब्बल २५ रुपयांची वाढ : नागरिकांचा संताप उफाळला
– एकीकडे जीएसटी कमी करून ‘बचत उत्सव’, तर दुसरीकडे आधारवर वाढलेले शुल्क; नागरिकांचा सवाल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना आता तब्बल २५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने जाहीर केलेले नवे दर आजपासून (१ ऑक्टोबर) लागू झाले असून, या निर्णयामुळे जनतेवर आर्थिक ओझे वाढले आहे.
विशेष म्हणजे, देशभरात जीएसटी कमी करून ‘बचत उत्सव’ साजरा करण्यात येत असतानाच आधार सेवांमध्ये मोठी शुल्कवाढ केल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. “एकीकडे बचतीचे गोड बोल, तर दुसरीकडे आधार शुल्काच्या नावाखाली कात्री; हाच काय बचत उत्सव?” असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
नवीन दरांनुसार –
बायोमेट्रिक अपडेट (बोटांचे ठसे, रेटिना, छायाचित्र) ५–७ व १५–१७ वर्षांच्या मुलांसाठी एकदा मोफत; परंतु इतर वेळी शुल्क १०० ऐवजी आता १२५ रुपये (जीएसटीसह).
७ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट सेवा ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मोफत.
डेमोग्राफिक अपडेट (नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल, ई-मेल) बायोमेट्रिकसोबत मोफत; स्वतंत्र केल्यास ७५ रुपये शुल्क.
डॉक्युमेंट अपडेट (ओळख व पत्ता पुरावा) – myAadhaar पोर्टलवर १४ जून २०२६ पर्यंत मोफत; मात्र आधार केंद्रावर आता ५० ऐवजी ७५ रुपये आकारले जाणार.
जिल्ह्यातील अडचणी
गडचिरोली जिल्ह्यात आधार सेवा केंद्रांची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांना लांब अंतर पार करून केंद्रांपर्यंत पोहोचावे लागते. परिणामी, आधार केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असून तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. शुल्कवाढीमुळे त्रस्त नागरिकांना आता या प्रक्रियेत अधिकच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, एकीकडे आधार कार्ड अपडेट करा अन्यथा सेवा बंद होणार असे सांगून लोकांना रांगेत उभे करायचे आणि दुसरीकडे शुल्कवाढ करून खिशाला कात्री बसवायची, असा ‘लूटमार पद्धतीचा’ कारभार सुरू आहे.
याशिवाय, “जीएसटी कमी झाला तरी आधार सेवेला का टाकण्यात आला नाही? आधीपासूनच १८ टक्के जीएसटी आकारला जातो, मग सामान्यांना दिलासा का नाही?” असा सवाल नागरिकांकडून जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.
UIDAI च्या या निर्णयामुळे आधार अपडेट महागडे ठरणार असून, नाराज नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #AadhaarUpdate #AadhaarFeeHike #UIDAI #GST #AadhaarServices #DigitalIndia #PublicReaction #IndiaNews #GadchiroliNews #BreakingNews #CitizenIssues #IdentityUpdate #GovernmentPolicies #AadhaarCard #NewsUpdate














