– आम आदमी पार्टीचे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १० : कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्हा संघटनेतर्फे करण्यात आली. या संदर्भात पक्षाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके यांना निवेदन सादर केले.
यावेळी जिल्हा संघटनमंत्री ताहीर शेख, सहसंघटनमंत्री चेतन गहाणे, कोषाध्यक्ष इरफान पठाण, सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम आणि कामगार आघाडी प्रमुख साईनाथ कोंडावार उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, कुरखेडा व कोरची तालुक्यातील डायलिसिस रुग्णांना उपचारासाठी गडचिरोली किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे जावे लागते. प्रवासाचा त्रास आणि आर्थिक ओझ्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे, एक वर्षापूर्वीच कुरखेडा येथे डायलिसिस केंद्रासाठी इमारत बांधकाम पूर्ण झालेले असूनही सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे तातडीने केंद्र सुरू करून स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
ताहीर शेख यांनी सांगितले की, “रुग्णांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही प्रशासनाकडे या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करू.” पक्षाच्या या पुढाकाराचे नागरिकांनी स्वागत केले असून प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














