– प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामात पेरलेली धान, कपाशी आणि इतर पिके नष्ट झाली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र शासन अद्याप ठोस उपाययोजना करत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज कृषी अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन छेडले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून, त्यात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
आंदोलनात शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, दुबार पेरणीसाठी आवश्यक शासकीय पाठबळ व दर्जेदार बी-बियाणे मोफत किंवा अनुदानावर उपलब्ध करून द्यावीत, जिल्ह्यातील खतांचा तुटवडा दूर करून युरिया व डीएपी खत सहज मिळावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ‘लिंकिंग’ पद्धतीने खते विक्रीस भाग पाडले जात असून, ही अन्यायकारक प्रणाली त्वरित थांबवण्याची गरज असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
बोगस बी-बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधातही काँग्रेसने संताप व्यक्त केला असून, अशा फसव्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या आंदोलनात माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महिला अध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, विविध तालुकाध्यक्ष, सेलप्रमुख, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनानंतर कृषी अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही शेतकऱ्यांना खते, बियाणे, आणि नुकसानभरपाईसाठी झगडावे लागत असल्याने काँग्रेसने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट हल्ला चढवला आहे. हे आंदोलन प्रशासनाला जाग देईल का, याकडे जिल्ह्यातील शेतकरीवर्ग आशेने पाहत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #FarmersProtest #GhantanadAndolan
#CongressGadchiroli #SupportFarmers #AgricultureCrisis #FakeSeedsIssue #FertilizerShortage #DoubleSowingSupport #GadchiroliNews #FarmersRights #घंटानादआंदोलन
#शेतकरीआंदोलन #काँग्रेसगडचिरोली #शेतकऱ्यांच्या_मागण्या #गडचिरोलीशेतीसंकट #कृषीअपयश #शेतकरीविरोधातअन्याय #दुबारपेरणी #खतांचा_तुटवडा #बोगसबियाणेविरोधात