– पोल माउंटेड मीटरला फसवणारी योजनाबद्ध चोरी, भरारी पथकाची कारवाईही निष्प्रभ?
The गडविश्व
ता.प्र / सावली, दि. १४ : तालुक्यातील व्याहाड खुर्द येथून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. वीजचोरी रोखण्यासाठी लावलेल्या पोल माउंटेड मीटरमध्ये छेडछाड करून थेट वीजचोरी केल्याचा प्रकार भरारी पथकाने गुरुवार १० जुलै रोजी केलेल्या धडक कारवाईने उघडकीस आला आहे – विशेष म्हणजे ही चोरी कोणी बाहेरचं नव्हे, तर वीज विभागातील कर्मचाऱ्यानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान भरारी पथकातील अधिकाऱ्यांची संपर्क होऊ न शकल्याने त्या वीज कर्मचाऱ्याच नाव अद्याप कळू शकले नाही. मात्र प्रतिनिधीमार्फत त्याबाबत माहिती काढण्याचे काम सुरु आहे.

पोल माउंटेड मीटरही फसवले !
वीज वितरण कंपन्यांनी वीजचोरी थांबवण्यासाठी उंचावर पोल माउंटेड मीटर बसवले होते. ही यंत्रणा छेडछाडमुक्त मानली जात असली, तरी व्याहाड खुर्दमधील वीज कर्मचाऱ्याने चक्क हे मीटर महिन्यातील २० ते २५ दिवस बंद ठेवून बिनधास्त वीज वापर केला. रीडिंगच्या वेळेस मीटर चालू करून कायदेशीर वापराचा दिखावा केला जात होता.
भरारी पथकाचा छापा, पण भीती कुणाला?
१० जुलै रोजी गडचिरोलीहून आलेल्या भरारी पथकाने या प्रकारावर छापा टाकून मीटर जप्त केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली. कारवाईनंतरही संबंधित कर्मचाऱ्याने वीज वापर सुरूच ठेवल्याने कारवाई ही केवळ दिखावा होती का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
यावरून कारवाईचा कोणताही धाक उरलेला नाही हे स्पष्ट होते. या प्रकरणात जनतेचा रोष अधिक तीव्र होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे, भर उन्हाळ्यात सर्वसामान्य नागरिक कुलर, फ्रिज यांसारख्या आवश्यक वस्तू वापरत असताना त्यांना हजारोंचं वीज बिल येते; तर दुसरीकडे वीजचोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र किरकोळ रक्कमेचे बिल येत असल्याचे समोर आले आहे. ही बाब प्रामाणिक ग्राहकांसाठी अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
तक्रारींना केराची टोपली
स्थानिकांनी यापूर्वी अनेक वेळा चंद्रपूर वीज विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, “एका तक्रारीसाठी येऊ शकत नाही” असे सांगून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या पाठीशी कोणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहे का, याबाबत संशय बळावतो आहे.
“चोरीवर कारवाई करणारेच चोरी करत असतील तर?”
हा प्रकार केवळ वीजचोरीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण वीज वितरण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. पोल माउंटेड मीटरसारखी सुरक्षित यंत्रणा जर विभागातीलच कर्मचारी फसवत असतील, तर कठोर आणि उदाहरण ठरावी अशी कारवाई अपरिहार्य ठरते.
जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित कर्मचाऱ्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा, हा “वीजचोरीचा खेळ” थांबणार नाही, असा लोकांचा स्पष्ट इशारा आहे.
संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून हे पुढील भागात कळू शकणार आहे.
#thegdv #crimenews #ElectricityTheft #Corruption #PowerDepartment #MeterTampering #MaharashtraNews #ViahadKhurd #Sawala #EnergyScam #GovernmentNegligence #Accountability #PublicOutrage #FlyingSquad #PowerTheftExposed #ElectricMeterFraud #IndiaNews #ActionNeeded
#वीजचोरी #सावली #व्याहाडखुर्द #विद्युतविभाग #भ्रष्टाचार #पोलमाउंटेडमीटर #वीजचोरीप्रकरण #भरारीपथक #गडचिरोली #महाराष्ट्रबातमी #ताजाबातमी #सामाजिकअन्याय #लोकआक्रोश #कारवाईहवी #मराठीबातमी