चक्क गडचिरोली शहरात रानटी हत्तींची थरारक एन्ट्री

3484

– दोन टस्कर हत्तींचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
The गडविश्व
गडचिरोली, २५ मे : नक्षलवादाने ग्रासलेल्या आणि जंगलांनी व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता रानटी हत्तींचा आणखी एक धोका उभा राहिला आहे. आज पहाटेच्या सुमारास दोन टस्कर हत्ती गडचिरोली शहरात घुसल्याने खळबळ उडाली. इंदिरानगर, लांझेडा, रामनगर व रेड्डी गोडाऊन चौकात हे हत्ती मुक्तपणे फिरताना दिसले आणि काही तास शहर थरारात गढले.
नागरिक सकाळच्या फिरस्तीसाठी बाहेर पडत असताना अचानक समोर रानटी हत्ती दिसल्याने एकच धावपळ उडाली. हा थरार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर अपलोड केला असून पाहता पाहता व्हिडिओज्‌ व्हायरल झाले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरी भागात वन्यजीवांचा असा उघडपणे वावर ही पहिलीच वेळ असल्याने चिंता वाढली आहे.
२०१८ पासून ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील जंगलातून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा वावर सुरू झाला आहे. आतापर्यंत शेतपिकांचे नुकसान, घरे उद्ध्वस्त करणे, आणि काही घटनांमध्ये मानवी बळीही गेले आहेत. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात हत्तींचा वावर ही गंभीर बाब आहे. वनविभागाच्या यंत्रणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
सदर हत्ती गुरवळा जंगलात गेले असल्याचे कळते, तरी त्यांच्या पुन्हा शहरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
गडचिरोली शहर आता ‘हत्ती-संवेदनशील’ क्षेत्रात? प्रशासन सज्ज की निष्क्रिय – या थरारक घटनांनी उघड केला प्रश्नांचा महापुर.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #elephantentrygadchirolicity )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here