– सहकारी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू
The गडविश्व
सावली, दि. १८ : सावली तालुक्यात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. व्याहाड बुज येथील नंदनी बिअर बारजवळ भरधाव वेगात धावणारी स्कॉर्पिओ (MH 33 AC 8712) सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित झाली आणि थेट पलटी झाली. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात १७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास झाला.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गडचिरोलीहून व्याहाडकडे येत होती. सायकलस्वार अचानक समोर आल्याने वाहन चालकाने वळण घेण्याचा प्रयत्न केला. याच क्षणी गाडीचा मागील टायर फुटला आणि स्कॉर्पिओनं नियंत्रण गमावून रस्त्याच्या कडेला एकापाठोपाठ एक पलटी घेतली.
या धक्कादायक घटनेत अनिरुद्ध कोवे (वय २५, रा. केरोडा) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला सहकारी गंभीर जखमी असून त्याला तातडीने गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. स्थानिक नागरिकांनी अनिरुद्ध कोवे यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
