– 54 मिनी ट्रॅक्टर, 10 थ्रेशर मशिन व स्प्रे पंपांचे वितरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गडचिरोली पोलीस दल “पोलीस दादालोरा खिडकी”च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून, गडचिरोली पोलीस दल, समाज कल्याण विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ ८ मार्च २०२५ रोजी एकलव्य सभागृह आणि पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील कवायत मैदानावर संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागांतील ५४ बचत गटांच्या ५०० हून अधिक महिला लाभार्थी उपस्थित होत्या. या वेळी ५४ बचत गटांना मिनी ट्रॅक्टर, १० बचत गटांना थ्रेशर मशिन आणि इतर बचत गटांना स्प्रे पंपांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा या उद्देशाने हे कृषी अवजारे वितरित करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ९,३९,४४९ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
यामध्ये प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत १६,५०३ शेतकऱ्यांना कृषी बियाणे वाटप, ५,५४० शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, शेळीपालन इत्यादींचे प्रशिक्षण व साहित्य पुरविण्यात आले. १७६ शेतकऱ्यांना “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना”चा लाभ मिळवून देण्यात आला. १६ कृषीदर्शन सहलींमध्ये ७३८ शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. याआधीही विविध मेळावे आणि उपक्रमांच्या माध्यमातून ५२ थ्रेशर मशिन, ३८ झिरो ट्रिल ड्रिल, १५ भात रोवणी यंत्र आणि ४३ पॉवर विडर यांसारख्या कृषी साधनांचे वाटप करण्यात आले आहे महिला बचत गटांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ६,०२० महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात आले आहे.
२,९०५ महिलांना नर्सिंग, जनरल ड्युटी असिस्टंट, हॉस्पिटॅलिटी आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. २,९०७ महिलांना फास्टफूड व्यवसाय, ब्युटी पार्लर, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, सॉफ्ट टॉईज निर्मिती यांसारख्या स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुर्गम भागातील २०८ युवतींना कराटे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
या कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यातील माओवादग्रस्त आदिवासी भागांतील शेतकरी कुटुंबातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कृषी अवजारे वाटप करण्यात येत आहेत. प्रत्येक महिलांनी आपल्या मुलींना उत्तम शिक्षण द्यावे आणि स्वतःमधील शक्ती ओळखून स्त्री अत्याचारांपासून मुक्तता मिळवावी.”
तसेच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्हा प्रशासन शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून काम केले जात आहे.”
यावेळी त्यांनी पोलीस दादालोरा खिडकी आणि प्रोजेक्ट उडान या पोलीस दलाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमास जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. व्ही. सत्यसाई कार्तिक, समाज कल्याण विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी तसेच गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी (पोस्टे/उपपोस्टे/पोमके) तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले.
