गडचिरोली : चारचाकी वाहनाच्या धडकेत म्हशी ठार, वाहनात मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा

2086

-म्हशी मालकाचे लाखोंचे नुकसान
The गडविश्व
गडचिरोली, दि.०९ : चारचाकी वाहनाच्या धडकेत चार म्हशी ठार झाल्याची घटना ०८ मार्च रोजी रात्रो ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर नाल्यानजीक घडली. विशेष म्हणजे सदर चारचाकी वाहन हे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत होते. घटनास्थळी वाहनात मोठया प्रमाणात दारू साठा आढळून आला असून अपघातानंतर चालक फरार झाल्याचे समजते. तर वाहनावर रक्ताचे शिंतोळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून आले. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतांना एवढा मोठा दारू साठा कोणत्या मार्गाने आला याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी मार्गे गडचिरोलीच्या दिशेने चारचाकी वाहनातुन अवैधरित्या दारूची तस्करी होत होती. दरम्यान गोविंदपूर नाल्यानजीक दारू तस्करी होत असलेल्या चारचाकी वाहनचालकाने गोविंदपूर नाल्याकडून येवलीकडे जाणाऱ्या चार म्हशींना जबर धडक दिली. या धडकेत चारही म्हशी गतप्राण झाल्या. अपघातानंतर वाहन चालक हा घटणास्थळावरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून कळाले. घटनेची माहिती होताच येवली येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात येवली येथील प्रभाकर म्हशाखेत्री यांच्या म्हशी दगावल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सदर वाहनात मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळून आला आहे. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असता पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनावर कोणतेही नंबर प्लेट नव्हते अशीही माहिती आहे. पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकत संपूर्ण चारचाकी वाहन भरून दारूची तस्करी होत होती मात्र अपघात झाल्याने ही दारू तस्करी फसल्याचे बोलल्या जात आहे. संपूर्ण वाहन भरून दारू असल्याने हा मुद्देमाल लाखोंच्या घरात असल्याचे समजते. जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही दारू तस्कर वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत दारू तस्करी करीत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता गडचिरोली पोलीस स्टेशन येथे संपर्क केला असता कोणतीही माहिती मिळाली नाही.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here