The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : हरणघाट-चामोर्शी रस्ता राज्यमार्ग – ३७० कि.मी. ३४/६७० ते ४९/५०० वर रस्त्याची सुधारणा करण्याचे काम शासनाकडून मंजूर असून कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सदर रस्त्यावर सुरजागड येथील लोह खनिज तसेच कोनसरी येथील लॉयडस मेटल कंपनीचे जड व अतिजड वाहनांची वर्दळ सुरु असल्याने काम करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने सदर मार्गावरील जडवाहतुक बंद करण्यात आली असून वाहतूक चामोर्शी- गडचिरोली- मुल या पर्यायी मार्गाने वळती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, संजय मीणा यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन याद्वारे आदेशित केले आहे की, हरणघाट- चामोर्शी रस्ता राज्यमार्ग -३७० मार्गावरील दोन्ही बाजुने सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतुक (प्रवासी बसेस व पाणीपुरवठा/महावितरण/दुरसंचार/रस्ते दुरुस्तीसंदर्भात वाहने वगळून) वाहनांना ०१ फेब्रुवारी २०२४ ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत प्रवासास मज्जाव असेल. उक्त कालावधी करिता पर्यायी मार्ग म्हणून आष्टी- चामोर्शी- गडचिरोली-मुल या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११६ चे तंतोतंत पालन करावे. वाहतुकीस अयोग्य रस्ता वा पुल बिना बॅरेकंडीग वा योग्य काळजी न घेता खुले ठेवल्यास सदर मार्गावर अपघात झाल्यास संबंधित विभागप्रमुख तसेच संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल याची दक्षता घ्यावी. तसेच सदरचे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कोणत्याही वाहतुकदारास व व्यक्तीविरुद्ध भारतीय दंडसहिता १८६० महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे प्रचलीत नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असेल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
