१९ ला शिक्षकेतर महामंडळाचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन

68

– राज्यभरातून सुमारे ७ हजार शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र रविवारी १९ जानेवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे होणार आहे. हा राज्यस्तरीय अधिवेशन शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून या अधिवेशनासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षकेतर संघटना महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी केले आहे.
चिमूर येथील पिंपळनेरी मार्गावरील शहीद बालाजी सभागृहामध्ये होत असलेल्या शिक्षकेत्तर महामंडळ अधिवेशनासाठी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार अमर काळे, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार बंटी भांगडीया, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगांवर, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह विविध विभागांचे आमदार, चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लागले असले तरी अद्याप अनेक प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. याच अनुषंगाने खुले अधिवेशन व चर्चासत्र होणार असून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या अधिवेशनास मंजुरी दिली आहे. राज्यभरातून सुमारे ७ हजार शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षात सोडविण्यात आले आहेत. परंतु, अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर शिक्षकेतर महामंडळाच्या अधिवेशनात सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनला जिल्हातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघटनाचे जिल्हा अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, कार्याध्यक्ष संदीप भरणे, उपाध्यक्ष नंदलाल लाडे, शैलेश कापकर, प्रमोद येलमुले, भूपेश वैरागडे, अभिजित शिवणकर, अरुण धोडरे आदी पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here