-घोट ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : चामोर्शी तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून ओळख असलेल्या घोट येथे आयोजित ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. सोबतच अहिंसक कृती करून एका विक्रेत्याकडून ५० लिटर मोहफुलाची दारू जप्त करीत घोट पोलिस मदत केंद्राच्या माध्यमातून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामपंचायत घोट येथे १३ जून रोजी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावातील वाढती दारू विक्री व दारू पिणाऱ्यांचे प्रमाण यावर चर्चा करण्यात आली. घोट ग्रामपंचायतचे सरपंच रुपाली दुधबावरे यांनी दारू पिऊन गावात घरगुती हिंसाचार , झगडे भांडण वाढत असल्याचे सांगितले. मुक्तीपथ तालुका संघटक यांनी गावातील दारू विक्री बंद करण्याबाबत मार्गदर्शन केले व सर्वानुमते दारू विक्री बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी गावातील दारू विक्रेत्यांना सूचना देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार दिनांक १४ जून रोजी ग्रामपंचायत मार्फत मुनादी देवून दारू विक्री बंद करण्याबाबत सूचना दिल्या. तरीही दारू विक्री सुरू असल्याची माहिती तंटामुक्ति अध्यक्ष व पोलिस पाटिल यांना मिळाली. त्याअनुषंगाने मुक्तीपथ अभियानाचे संघटक आनंद इंगळे व विनोद पांडे यांनी ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन दारू विक्रेत्यांना गृहभेट करून नोटीस देण्याचे ठरविण्यात आले व लगेच ७ दारू विक्रेत्याच्या घरी भेटी दिले. जिथे संशय आला तिथे तपासणी करून दारू विक्री बंद करण्याबाबत सूचना दिल्या. तपासणी दरम्यान एका दारू विक्रेत्याच्या घरी ५० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. याबाबतची माहिती मिळताच घोट पोलीस मदत केंद्र येथील प्रभारी अधिकारी नितेश गोहने यांनी हजर राहून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. यावेळी सरपंच , पोलिस पाटिल , तंटामुक्ती अध्यक्ष उर्मिला वोगुलवार , उपसरपंच राकेश बरसागडे, मुक्तीपथ गाव संघटनचे लता सातपुते, रेखा मोगरे, हसीना शेख, वनिता चाफदे, कुनघाडकर, सुशीला वाढई, निला मोहुर्ले, बेबी गाऊत्रे, सुशीला आत्राम, निरंजना मोहुर्ले, मुक्तिपथचे आनंद इंगळे व विनोद पांडे उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #muktipath #gadchirolinews )