लाचखोर महसूल कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा

612

– उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना पत्रकार शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनातून मागणी
The गडविश्व
राहुल भोयर / ब्रम्हपुरी : अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असताना रेतीतस्करांवर महसूल विभागाचे कर्मचारी कोणतीही कारवाई न करता आपसी समझोत्याने तसेच तडजोड करून प्रकरण दडपण्याचा प्रकार तालुक्यात निदर्शनास येते आहे. याबाबत लाचखोर महसूल कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना पत्रकार शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
१२ मार्च २०२२ ला तोरगाव गावा जवळ रात्रो ११ वाजताच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर शासकीय नियमावली नुसार कुठलीही कारवाई न करता तालुक्यातील ३ तलाठी कर्मचाऱ्यांनी ९६ हजार रुपयाचे परस्पर आर्थिक व्यवहार करीत आपसी समझोत्याने पाहार्णी येथील दोन तर तोरगाव येथील एक वाहन सोडून दिल्याची लेखी तक्रार स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पत्रकारांना देत लाचखोर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी व तस्करीला लगाम यावा अशी विनंती केली होती. तर याबाबत स्थानिक वृत्तपत्रांमधून बातम्या ही प्रकाशित झाल्यात मात्र सदर कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
तसेच कुर्झा हनुमान मंदिर जवळ २७ मार्च ला रात्रो ११ वाजताच्या दरम्यान रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाच्या उर्मट वागणुकीने शुन्य रॉयल्टी असलेला वाहन स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे लावला असता, उलट या नागरिकांनाच अपमानास्पद वागणूक देउन रात्रो १२ वाजताच्या नंतर वेळवर आणलेली रॉयल्टी ग्राह्य धरत वाहन सोडून देण्यात आले.
अवैध वाळू तस्करी करीत महसूल बुडवणाऱ्या वाहण धारकासह परस्पर आर्थिक व्यवहार करीत लाचखोरी केल्याने सदर प्रकरणामुळे तालुक्याच्या प्रतिमेला महसूल प्रशासनाच्या लाचखोरीने धक्का लागला असून तालुक्याची सर्वत्र बदनामी होत आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ब्रम्हपुरी तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
प्रशासन लाचखोरांची पाठराखण करणार अथवा कायदेशीर कारवाई करणार हे पाहणे आता तालुक्यातील नागरिकांसाठी औचित्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here