– ४३ हजार ४८० रुपयांचा मुद्देमालासह धारदार शस्त्र केले जप्त
The गडविश्व
वर्धा : कमी किंमतीत बनावट सोने विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी धर्मराज उर्फ रामू गंगाप्पा भोसले (४०) रा. रिमडोह व विधिसंघर्षित बालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन ४३ हजार ४८० रुपयांचा मुद्देमालासह धारदार शस्त्र जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत मोहनराव उमाटे रा. ज्ञानेश्वर नगर, म्हसाळा हे ऑटोचालक असून वर्धा ते पुलगाव असे प्रवासी वाहतूक करतांना २३ मार्च रोजी आरोपी व विधिसंघर्षित बालक याच्याशी ओळख झाल्याने आरोपीने प्रशांत उमाटे यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यांना वारंवार फोन करुन त्यांच्याकडे सोने विक्रीकरिता असून कमी किमतीत विकायचे आहे असे प्रलोभन देत २६ मार्च रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील दाभा शिवारातील रेल्वे पटरी जवळ येऊन आरोपींनी प्रशांत उमाटे यांना सोन्यासारख्या दिसणार्या पिवळ्या धातूच्या ६ नग पट्ट्या देऊन असली सोने आहे असे भासवून उमाटे यांच्याकडून २० हजार रुपये घेतले त्यानंतर उमाटे यांनी सदर सोन्याची सोनाराकडून पडताळणी केली असता सदरच्या पट्ट्या नकली असल्याचे समजल्याने उमाटे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता २७ मार्च रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याची तात्काळ दखल घेत अनोळखी आरोपींचा शोध घेणे सुरू केले असता संशयित आरोपी हे हिंगणघाट हद्दीत फिरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कापरे यांच्यासह पथकाने दाभा ते कवठे घाट शिवारातील जंगलात सापळा रचून आणि पाठलाग करून आरोपी धर्मराज उर्फ रामू गंगाप्पा भोसले व विधिसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ५ मोबाइल, एक धारदार लोखंडी पात्याची गुप्ती सारखे हत्यार, दोन कटर, सोन्यासारख्या दिसणार्या पिवळ्या धातूच्या २० पट्ट्या आणि मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त केला. आरोपी धर्मराज भोसले याचा ३० मार्च पर्यंत पोलीस रिमांड प्राप्त केला असता पोलिस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुली वरून सोन्या सारखी दिसणारे ४ नग दोन ग्रॅम वजनाचे तुकडे, प्रशांत उमाटे यांची फसवणूक करून घेतलेले नगदी २० हजार रुपये, धातू कापण्याचा एक लोखंडी लांब अडकित्ता, १४ नग गोलाकार पिवळ्या धातूच्या अंगठ्या, पिवळ्या धातूच्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या २२ नग पट्ट्या असा एकूण ४३ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच आरोपी जवळ धारदार गुप्ती सारखे शस्त्र मिळून आल्याने सदर गुन्ह्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे वाढ करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अमलदार विवेक बनसोड, प्रशांत भाईमारे, विलास कोकोडे, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले, राहुल साठे, संग्राम मुंडे, रमेश सोनेकर विशाल ढेकले, नितीन ताराचंदी, आकाश कांबळे आणि गृहरक्षक प्रशांत वाघ व गोलू काटकर यांनी केली.
