६३ वर्षीय जहाल पुरुष नक्षलीसह महिला नक्षलीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

1248

– १२ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर
– गडचिरोली पोलीस दलाची आत्मसमर्पित योजना ठरत आहे यशस्वी
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलिस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पित योजनेला यश मिळत आहे. आज २५ मे रोजी नुकत्याच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर ६३ वर्षीय पुरुष व ३४ वर्षीय महिला जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये रामसिंग उर्फ सीताराम बक्का (६३) रा. अर्कापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली व माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी (३४) रा. गट्टेपल्ली पोमके हालेवारा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांचा समावेश आहे. सदर जहाल नक्षलींवर १२ लाख रुपायांचे बक्षीस जाहीर होते. शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.
रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम हा मार्च २००५ ला अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत व ३ महिने पेरमिली मध्ये कार्यरत होता. मे २००५ पासुन तो माड डिव्हीजन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होता. २००७ ते सन २०१२ पर्यंत उप-कमांडर पदावर कार्यरत होता. २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर पर्यंत कार्यरत होता. याच्यावर १ खून, १ चकमक व इतर १ असे एकुण ३ गुन्हे दाखल आहेत. कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी चकमकीत तो सहभागी होता. त्याने शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळत नाही, वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात, दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही, पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे, वरिष्ठ कॅडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्वत:च्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही, खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात, नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही यामुळे त्याने आत्मसमर्पण केल्याचे सांगितले तर माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी ही नोव्हेंबर २००२ ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ती डिसेंबर २०२२ पर्यंत कार्यरत होती, डिसेंबर २०१२ ते २०१३ पर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती, फेब्राुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. हीच्या वर ४ खून, २१ चकमक, ७ जाळपोळ व इतर ५ असे एकुण ३७ गुन्हे दाखल आहेत. वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये सहभागी होती. हिने महीला नक्षलींना वैद्यकीय कारणांकरीता पैसे दिले जात नाही, नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडून स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो, महीला नक्षलवाद्यांना वरच्या पदापर्यंत जाण्याची संधी मिळत नाही, महीला नक्षलवाद्यांना फक्त अवजड कामे दिली जातात व त्यांना महत्वाच्या अभियानात सहभागी केले जात नाही, वरिष्ठ माओवाद्याकडून महीला नक्षलींना लग्नासाठी बळजबरी केली जाते, पोलीस – नक्षल चकमकीदरम्यान महीला नक्षलींना समोर करून पुरूष नक्षलवादी हे पळून जातात त्यामुळे आत्मसमर्पण केले असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासनाने रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम याचेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. तर माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन मट्टामी हिचेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम यास एकुण ४.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन माधुरी ऊर्फ सुमन मट्टामी हीला एकुण ४.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०१९ ते २०२२ सालामध्ये आतापर्यंत एकुण ४९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल साो. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here