४१६  स्पर्धकांनी हातात घेतली दारू मुक्तीची मशाल

143

– देसाईगंज मधील २० गावांमध्ये रंगली मुक्तीपत मॅरेथॉन स्पर्धा
The गडविश्व
गडचिरोली, ७ नोव्हेंबर : मुक्तीपथ गावसंघटना अधिक भक्कम व्हाव्यात तसेच गावागावात अवैध दारू विक्री विरोधात लढा उभा करण्यासाठी गावातील लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने गाव संघटनेच्यावतीने देसाईगंज तालुक्यातील वीस गावांमध्ये मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध गावातील एकूण ४१६ स्पर्धकांनी दारू मुक्तीची मशाल हातात घेऊन अवैध दारू विक्री विरोधात संघर्ष करण्याची तयारी दर्शविली.
देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर, कोंढाळा, कुरुड, चोप, विसोरा, डोंगरगाव, पिंपळगाव, कोरेगाव, उसेगाव, विठ्ठलगाव, कोकडी, तुळशी, शंकरपूर, विहिरीगाव, किनाळा, चिखली,रिठ, सावंगी, कसारी, बोडधा अशा २० गावांमध्ये “रन फॉर मुक्तीपथ” मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध गावातील एकूण ४१६ युवक-युवती व महिला पुरुषांनी सहभाग दर्शविला. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी व पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान स्पर्धेचे रूपांतर सभेत करून गावाचा विकास साधण्यासाठी अवैध दारू विक्री बंद करणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. गावाला दारूमुक्त करण्यासाठी काय करावे, कोणत्या उपाययोजना कराव्यात, दारूबंदीचे फायदे, याबाबत मुक्तिपथ तालुका संघटिका भारती उपाध्ये, उपसंघटक अनुप नंदगिरीवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक लोकांनी मुक्तीपथ गाव संघटनेत सहभागी होत दारू विक्री विरोधातील लढ्यासाठी तयारी दर्शवली. सभेला पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here