२० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या २ जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण

2672

– टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

The गडविश्व
गडचिरोली : टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश मिळाले आहे. नुकतेच २० लाख रुपये बक्षीस असलेले जहाल नक्षली दाम्पत्य दिपक ऊर्फ मुन्शी रामसु ईष्टाम (३४) वर्ष रा. गडेरी, पोमके कोटमी ता. एटापल्ली जि. गडचिरोली व शामबत्ती नेवरु आलाम (२५) वर्ष रा. हिदवाडा पोस्टे ओरच्छा जि. नारायणपुर (छ.ग.) यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे.
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याच बरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.
दिपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती-पत्नी असून ते दोघेही प्लाटुन क्र. २१ मध्ये कार्यरत होते. दिपक ईष्टाम हा डीव्हिसी पदावर तर शामबत्ती आलाम ही प्लाटुन सदस्य म्हणुन कार्यरत होते. दिपक ईष्टाम याचेवर खूनाचे ०३, चकमकीचे ०८, जाळपोळ ०२ असे गुन्हे दाखल असुन, माहे जुलै- २००१ मध्ये तो कसनसुर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. माहे ऑक्टोंबर २००१ ते नोव्हेंबर २००२ पर्यंत तो चामोर्शी दलम सदस्य पदावर कार्यरत होता. त्यानंतर माहे-ऑक्टोंबर २००४ पर्यंत तो सीसीएम देवजी यांचे प्रोटेक्शन गार्डमध्ये कार्यरत होता. नंतर सन-२००६ पर्यंत कंपनी क्र.१ मध्ये ए सेक्शनमध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. २००९ ते २०१५ पर्यंत कंपनी क्र.१ ए प्लाटुन कमांडर पदावर व त्यानंतर सन २०१५ ते आजपर्यंत प्लाटुन क्र. २१ मध्ये डीव्हीसी पदावर कार्यरत होता. नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी ०६ ॲम्बुश लावले होते. त्याने लावलेल्या ॲम्बुश मध्ये छत्तीसगडमधील कुदुरघाटी ०४ , झाराघाटी ०२ , कोंगेरा २५ असे एकुण ३१ जवान शहीद झाले. पत्नी शामबत्ती हीचेवर चकमकीचे ०२ असे गुन्हे दाखल असून, ती सन २०१५ मध्ये ०८ महीने जनमिलीशियामध्ये व त्यानंतर प्लाटुन क्र.१६ मध्ये सदस्य पदावर भरती होवुन आजपर्यंत प्लाटुन क्र. २१ मध्ये कार्यरत होती.
शासनाने दिपक ईष्टाम याचेवर १६ लाख रूपयाचे तर शामबत्ती आलाम हिचेवर ०४ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे पुनर्वसनाकरीता शासनाकडुन दिपक ईष्टाम यास ०६ लाख रुपये व शामबत्ती आलाम हीला २. ५ लाख रुपये तसेच पती-पत्नीने एकत्रीत आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त १.५ लाख असे एकुण १० लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळवुन देण्यात येणार आहे.गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ ते २०२२ सालामध्ये आतापर्यंत एकुण ४५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ५ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०३ उपकमांडर, ३४ सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. सदर नक्षलींचे आत्मसमर्पण घडवुन मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे साो., अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे सपोनि बाबासाहेब दुधाळ यांनी पार पाडुन मोठी भुमिका बजावली आहे. टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ०२ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.
आतापर्यंत एकुण ६४९ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेले असून गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातुन एकुण १४४ आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना भुखंड वाटप, ११७ आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना घरकुल वाटप, ६४३ आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना आधारकार्ड वाटप, ३६ महिला आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना शिलाई मशिनचे वाटप, २३ आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांना शेळी पालन व इतर अनेक शासकिय योजनांचा लाभ मिळवुन देण्यात आला आहे. त्यामुळे आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत असून ते लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात सामिल होवुन सन्मानाने जीवन जगत आहेत.
विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल साो. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here