The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्य केंद्रशासनाने विविध उपक्रम राबविण्याबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान), सोमय मुंडे सा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅली व मॅराथॉनचे आयोजन उद्या १४ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले असून, सकाळी ०७.०० वा. सायकल रॅली इंदिरा गांधी चौक ते जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयापर्यंत राहणार आहे. तसेच सकाळी ०७.३० वा. मॅराथॉन जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयापासुन सुरू होवून इंदिरा गांधी चौकापर्यंत व परत इंदिरा गांधी चौकापासून जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयापर्यंत राहणार आहे.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ च्या निमीत्ताने पोलीस मुख्यालय स्तरावर गडचिरोली जिल्हयातील शालेय मुलांकरीता विशेष उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमांतर्गत शालेय मुलांना पोलीसांचे गणवेश, शस्त्रास्त्रे, विशेष वाहने, फोटोग्राफ्स, शहीदांच्या शौर्यगाथा चित्रफित श्वान प्रात्यक्षिके, शौर्यस्थळ इत्यादी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. आता पर्यंत गडचिरोली येथील विविध शाळा / महाविद्यालयातील १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे भेट दिली. त्यांना पोलीस मुख्यालयाकडुन गडचिरोली पोलीसांचे गणवेश, शस्त्रे, मोटार वाहन विभागाकडुन विविध प्रकाराची वाहने, श्वान पथकाकडुन श्वानाबाबत माहीती देवुन श्वान प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. विद्यार्थ्याना चित्रफित दाखवुन गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व विशेष अभियान पथकाच्या कामगिरीबाबत माहिती देण्यात आली. तसेच शहीदांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या शौर्यस्थळाला भेट देवुन तिथे संग्रह करण्यात आलेल्या वस्तुंचे तसेच शहीदांच्या बलीदानाविषयी जनसंपर्क कार्यालयाकडुन माहिती देण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाने आयोजीत केलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शाळा / महाविद्यालयाचे तसेच नागरिकांचे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असून, सायकल रॅली व मॅराथॉनमध्ये सुध्दा मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.