The गडविश्व
सातारा, ३१ ऑक्टोबर : कोणत्याही प्रकारची बातमी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहोचविण्याचे काम डिजिटल मीडिया करीत आहे. डिजिटल मीडियाशी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक जोडलेली आहेत. तरी या माहिती पोहचविण्याच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल मीडियाने आपली विश्वासार्हता निर्माण करावी. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २०२२ च्या उद्घाटन प्रसंगी अधिवेशनास दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले.
मुख्यमंत्री शिंदे संदेशात पुढे म्हणाले, पुस्तक व डिजिटल अशी दोन्ही माध्यम आज अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. कोरोना संकटाच्या काळात डिजिटल मीडियाने चांगली कामगिरी करुन नागरिकांना जागृत करण्यासोबतच धीर देण्याचे मोठे काम केले आहे. विविध सुविधांसाठी संघटनेने एक आदर्श नियमावली व आचार संहिता तयार करावी. सत्यता, सभ्यता व लोकाभिमुखता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून मीडियाचा विस्तार करावा. लोकांपर्यंत क्षणार्धात माहिती पोहचविण्याचे हे साधन आहे. या क्षेत्रातील संपादक पत्रकारांच्या समस्या या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत नक्की पोहोचतील. डिजिटल मीडियातील बांधवांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा निश्चित पणे प्रयत्न करु, असेही ते यावेळी संदेशात म्हणाले.
