The गडविश्व
सिरोंचा : सध्या सिरोंचा येथे सिंहस्थ पुष्कर मेळावा सुरु असून या मेळाव्यास महाराष्ट्र आंध्रप्रदेश तेलंगाणा, छत्तीसगढ अश्या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर प्राणहिता नदीच्या काठावर जमा होऊन पवित्र स्नानाचा अनुभव घेत असतात. भाविकांचा मेळाव्यास मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. या मेळाव्यास येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनातील सर्वच विभाग रात्रंदिवस काम करीत आहेत त्याचाच प्रत्यय आज सिरोंचा नदी घाट येथे आंध्रप्रदेश मधून आलेल्या तेजे कुटुंबियांना आला. अरुण तेजे रा. श्रीकाकुलांम्, आंध्रप्रदेश हे त्यांचे कुटुंबीयासह सिरोंचा येथे पुष्कर मेळाव्यात स्नान करण्यासाठी आले होते. त्यांचे सोबत त्यांचा ७ वर्षाचा मुलगा गुडला व कुटुंबातील अन्य सदस्य असे मिळुन सकाळी ९ वाजता सिरोंचा नदी घाटावर स्नान करण्यासाठी गेले. अरुण तेजे व त्यांचे कुटुंबीय नदीमध्ये स्नान करण्यासठी उतरले असता त्याचे लहान मुलास पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला त्यावेळी घाबरून तेजे कुटुंबीयांनी आरडा ओरड सुरु केली त्याचवेळी घाट परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी शिवराज लोखंडे व पोलीस अंमलदार प्रवीण रामटेके यांच्या लक्षात सदरची घटना आली. त्यांनी अजिबात वेळ न दवडता त्या ठिकाणी जाऊन पाण्यात उडी घेऊन पाण्यात पूर्णपणे बुडालेल्या गुडला यास लगेच बाहेर काढून घाटावरच उभारलेल्या प्रथमोपचार केंद्रात भरती केले. तेथील वैद्यकीय पथकाने गुडला याचे वर प्रथमोपचार केले असून सध्या गुडला याची प्रकृती स्थिर आहे व त्याला त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले.
तेजे कुटुंबीयांनी गडचिरोली जिल्हा प्रशासनाचे व पोलीस दलाचे आभार मानले आहेत त्याचप्रमाणे भाविकांना काही अडचण उद्भवल्यास नजीकच्या पोलीस मदत केंद्रात भेट देण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी बंदोबस्तातील या सतर्क अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन केले असुन सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा कळविल्या आहेत.