सिंदेवाही : नातवाने आजोबाची हत्या करून मृतदेह घरीच पुरला, ४५ दिवसांनी घटना आली उघडकीस

394

The गडविश्व
चंद्रपूर : आपल्या आजोबाची हत्या करून मृतदेह घरीच मातीमध्ये पुरून काही झालेच नाही असे राहून अखेर दुर्गंधी आल्याने ४५ दिवसांनी हत्येचे बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून आरोपीला अटक केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे आज उघडकीस आली आहे. सूरज सुधाकर सेलकर (२५), रा. बेंबाळ, ता. वरोरा असे आरोपीचे नाव आहे. तर कवडू देटे (७५), रा. लाडबोरी असे मृताचे नाव आहे.
आजोबा कवडू देटे यांची नातू सूरज सुधाकर सेलकर याने कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर आजोबाचा मृतदेह घरीच मातीमध्ये पुरला व काही झालेच नाही अशा तोऱ्यात आरोपी राहू लागला. मात्र, शंकरपटाच्या निमित्ताने आरोपीची आई लाडबोरीला आली आणि तब्बल ४५ दिवसांनी आज मंगळवारी हत्येचे बिंग फुटले.
आरोपीच्याच आईच्या तक्रारीवरून आरोपी असलेल्या नातवाला अटक करण्यात आली आहे. आरोपी सूरज हा आपल्या आईच्या वडिलांकडे म्हणजे मृत कवडू देटे यांच्याकडे मागील काही दिवसांपासून राहत होता. पैशावरून आरोपी सूरज व मृत कवडू देटे यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी सूरज व कवडू देटे यांच्यात वाद झाला. यात सूरजने आजोबा कवडू देटे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्यांचा मृतदेह घरासमोरील मातीत पुरला.
दरम्यान घटनेच्या ४५ दिवसांनंतर सोमवारी आरोपीची आई शंकरपटानिमित्त लाडबोरी येथे आली. घरात दुर्गंधी येत असल्याचे तिला जाणवले. काही ठिकाणी रक्ताचे डागही आढळले. शिवाय वडील कवडू देटे हेदेखील दिसत नसल्याने तिला संशय आला. तिने याबाबत सूरजला विचारले असता सूरजने हत्येची कबुली दिली. आईच्या तक्रारीवरून मंगळवारी सिंदेवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला व आरोपी सूरज सेलकर याला अटक केली आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here