सिंचन क्षेत्रात वाढ केल्यास जिल्ह्याचे चित्र बदलेल : राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

215

– गडचिरोलीत जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असून ही चिंतेची बाब आहे. रिकाम्या हातांना काम देऊन, शेतकऱ्यांना पाणी देऊन, त्यांच्या राहणीमानात बदल होईल व त्यांना आपोआपच रोजगार मिळेल आणि यातून जिल्ह्याचे सकारात्मक चित्र उभे राहून अपेक्षित विकासही साधता येईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. त्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिना दिवशी जिल्हा जलसंधारण अधिकारी गडचिरोली कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे, प्र.जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अप्पर आयुक्त जलसंधारण व्ही.एम. देवराज, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजित पाटील, नवीन कार्यालयाचे प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी पी.एम. इंगोले उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री म्हणाले या कार्यालयला जरी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली असली तरी आता प्रत्यक्षात त्याचे उद्घाटन संपन्न होत आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात तीन उपविभागीय मृद व जलसंधारण कार्यालये सुरू झाली आहेत. जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना सिंचनाच्या सवयी लावून त्यांच्या हाताला किमान वर्षभर काम राहिले तरी सिंचन क्षेत्रात बदल होऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात सुबत्ता नांदेल. जिल्ह्यातील उर्वरित 28 सिंचन क्षेत्राची कामेही येत्या वर्षात पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी सचिव व स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात सुरू झालेल्या नवीन कार्यालयामुळे आता नागरिकांना, शेतकऱ्यांना चंद्रपूरला जावे लागणार नाही आता जिल्ह्यातच कार्यालय सुरू झाल्यामुळे त्यांची कामेही तातडीने मार्गी लावा अशा सूचनाही यावेळी जिल्हा कार्यालयातील अधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांनी दिल्या.
जलसंधारण कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले. प्रास्ताविकात बोलत असताना ते म्हणाले की 0 ते 600 हेक्टर पर्यंतची कामे या विभागामार्फत राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा विभाग म्हणून जिल्ह्यात याची ओळख निर्माण होईल. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातील उणीव भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील हे तीन उपविभाग व जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय काम करेल. जिल्हा जलसंधारण कार्यालयाचे काम आता अधिक गतीने चालेल अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आपल्या मार्गदर्शनात कार्यालय सुरू झाले हा आनंदाचा क्षण असल्याचे नमूद केले. अधिकारी कर्मचारी यांच्याकडून चांगल्या प्रभावी कामाचीही अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाणी हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून त्यांच्यासाठी आता आवश्यक मदत या कार्यालयाने द्यावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here