– हिरापूर येथील सरपंच व उपसरपंचाचा प्रताप
– पत्रकार परिषदेत हिरापूरवासीयांनी केला आरोप
The गडविश्व
सावली : पात्र नसलेल्या व आपल्या मनमर्जीतील नातेवाईकांना हिरापूर येथील सरपंच व उपसरपंच यांनी घरकुलाचा लाभ दिलेला असून पात्र लाभार्थ्यांना डावल्याचा आरोप पत्रकार परिषदेत तेथील ग्रामस्थांनी केला आहे.
सावली तालुक्यातील हिरापूर येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीसाठी डिसेंबर महिन्यामध्ये ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेमध्ये गरजवंत पात्र लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांच्या यादीला ग्रामसभेने सर्वानुमते मंजुरी दिली व तसा ठराव सुद्धा पारित करण्यात आला. त्यात गावातील गरजू लाभार्थी तसेच अंध अपंग, विधवा, परितक्त्या, भूमिहीन, अल्पभूधारक लाभार्थ्यांचा समावेश होता. ग्रामसभा झाल्यानंतर काही दिवसांनी सरपंचांनी स्वतःच्या घरी उपसरपंच व मर्जीतील नागरिकांना बोलावून ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेल्या यादीतील लाभार्थ्यांचे नावे डावलून अपात्र असलेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभ दिला. सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पक्के मकान असलेल्या नातेवाईकांना घरकुलाचा लाभ देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सदर बाबीची तक्रार सावलीचे पंचायत समितीमध्ये करण्यात आली. परंतु अशा गंभीर बाबीकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. त्यामुळे या गावातील अनेक गरजवंत पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
हिरापूर येथील सरपंच यांचे पती काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून ग्रामपंचायत प्रशासनामध्ये ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तर आपल्या मर्जीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देत असल्याने पदाचा दुरूपयोग करणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांना अपात्र घोषित करून त्यांना पदमुक्त करण्यात यावे अशीही मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. \
यावेळी प्रभाकर राऊत, हरिदास कोडापे, जगन्नाथ नागापुरे, देविदास नागापुरे, प्रवीण नागापुरे, विनायक गेडेकर, चरणदास भोपये, जगन्नाथ पिंपरखेडे, विश्वनाथ पिंपरखेडे, मुखरु मडावी, हरिदास पेंदाम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.