– रुग्णालय स्त्रीरोगतज्ञा विना
The गडविश्व
सावली : तालुक्याचे मुख्यालय असून आरोग्य सेवेकरिता या शहरात ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित आहे. परंतु मागील अनेक वर्षा पासून या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञाचे पद रिक्त आहे तर सध्या स्थितीत फक्त दोनच वैद्यकीय अधिकाऱ्यावर या रुग्णालयाचा भार असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचा तालुका म्हणून सावली तालुक्याची ओळख आहे. याच तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
सावली तालुक्यात १११ गावांचा समावेश असून ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचाराकरिता सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात येत असतात. रुग्णांना तात्काळ सेवा मिळण्याच्या हेतूने येथील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात सेवा पुरविण्यास अडचण निर्माण होत आहे. परिसरातील अनेक महिला प्रसूती करिता या रुग्णालयात भरती होत असतात. परंतु प्रशिक्षित स्त्री रोग तज्ञ या रुग्णालयात नसल्याने अनेकदा प्रसूतीच्या वेळेस समस्या निर्माण झालेल्या आहेत तर प्रसूतीच्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केल्या जात आहे. शहरापासून ३० ते ४० किमी अंतर कापून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रसूती करिता रुग्णांना नेत असताना वाटेतच प्रसूती झाल्याच्या घटना आहेत तर कधी कधी वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळाचा किंवा महिलांचा मृत्यू झाल्याचे सुद्धा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन सावलीच्या ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची तर बाल रोग तज्ञ व स्त्री रोग तज्ञ नेमण्याची मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.
– तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा मिळावी व वेळेवर उपचार व्हावेत याकरिता रिक्त पदे भरण्यात यावे व रुग्णालयात अनेक वर्षापासून स्त्री रोग तज्ञ व बाल रोग तज्ञ नसल्याने याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.
– लता लाकडे, नगराध्यक्ष नगरपंचायत सावली
-ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ अभावी प्रसूती करिता आलेल्या रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा गंभीर बाबीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष पुरवून सावलीच्या ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरावीत.
– रोशन बोरकर, शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी