– २० रक्तदात्यांनी केले रक्तदान
The गडविश्व
देसाईगंज, १ ऑक्टोबर : तालुक्यातील चोप येथे सार्वजनिक बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २० रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चोप येथील ग्रामपंचायत सभागृहात दुर्गा उत्सव मंडळ, रक्त बँक गडचिरोली व उपकेंद्र चोप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे सह रक्तसंकलन चमूचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
त्यानंतर शुभम नागपूरकर यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसमोर मांडली. या रक्तदान शिबिरात २० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरामध्ये ज्ञानेश्वर बनपूरकर युवकाने सर्वप्रथम रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन शुभारंभ केला. गावातील जेष्ठ लोकांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. याप्रसंगी गावातील दुर्गा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतिष्ठित मंडळी, युवक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांना मंडळाकडून चहा व अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातील दुर्गा, शारदा उत्सव मंडळांनी असेच सामाजिक अभिनव उपक्रम कार्यक्रम राबवावे अशी अपेक्षा मंडळातर्फे व्यक्त करण्यात आली.
