

THE गडविश्व
चातगाव : शरीराला झालेले आघात दिसून येतात; पण मनाला झालेले आघात दिसून येत नाहीत. आपल्या शरीराला इजा होते, आजार होतात तसेच मनालाही इजा होते, आजार होतो! याची माहिती सामान्य लोकांना नसते. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी भागांतील लोकांमध्ये मानसिक आजाराबद्दल खूप कमी जागरूकता आहे . या भागातील खूप लोक हे मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन सर्चने आपल्या रुग्णालयामध्ये मानसिक रोगांवर उपचार करण्याचे काम हाती घेतले आहे. योग्य औषधोपचार व योग्य समुपदेशनाने मानसिक आजार असलेले रुग्ण बरे होताना दिसत आहेत.
गडचिरोली मधील लोकांचे मानसिक आरोग्य सुधारण्याचे काम सर्चच्या माध्यमातून केले जात आहे. मानसिक आजारांचा त्रास बऱ्याच लोकांना होत असतो. यामुळे अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त होते. व त्यांना मोठ नुकसान सहन करावे लागते. कारण मानसिक आजार जीवनातील अनेक गोष्टींवर परिणाम करतात. यामध्ये प्रामुख्याने बैचेन वाटणे, भीती वाटत राहणे, अंगाचा थरकाप होणे, तासनतास स्वतःशीच बोलत राहणे, कानात आवाज ऐकू येणे, कामावर लक्ष न लागणे, कोणीतरी आपल्याशी बोलत आहे असे भास होणे , शंका, वहम ,चक्कर येणे, झोप न येणे, स्वतःच्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण नसणे, सतत निराश राहणे , आत्महत्येचे विचार मनात येणे अशी काही लक्षणे मानसिक रोगी असणाऱ्या व्यक्ती मध्ये दिसून येतात.
‘ सर्च’ रूग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाची जबाबदारी मानसोपचरतज्ज्ञ डॉ.आरती बंग या सांभाळत आहेत. मानसिक आजार असलेल्या लोकांना योग्य समुपदेशन व औषधोपचार सर्च मध्ये करण्यात येत आहे . ‘सर्च’ हॉस्पिटल मध्ये आता दर आठवड्यातील सोमवार ते शनिवार ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ‘सर्च’ कडून करण्यात येत आहे.

