The गडविश्व
गडचिरोली,१ ऑगस्ट : विद्यापीठ परिक्षेत्र अंतर्गत युवक-युवतींकरिता रोजगार संबंधी उद्योजकता निर्माण करण्या हेतू तसे पोषक वातावरण निर्मिती करणे आवश्यक असते. या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठा ने भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अधिनस्त गोंडवाना विद्यापीठाच्या संस्थात्मक नवोपक्रम परिषदेचे गठण केले. त्या अंतर्गत विद्यापीठ परिक्षेत्रातील युवकांकरिता त्यांच्या कडील नवसंकल्पनेला प्रसूत करून नवउद्योजक निर्माण करण्याहेतू परिणामकारक व्याख्यान मालेच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन नूकतेच करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेत रेणुकीयांन एसोल्स, नागपूर चे प्रबंधक नितिन गुजराथी यांनी ‘ नवसंशोधनास पोषक वातावरण निर्मिती ‘ या विषयावर तर ‘कृषी आधारित उद्योजकता’ या विषयी जोश ए आय सोल्युशन्स प्रा लिमिटेड, पुणे चे संस्थापक संचालक, डॉ शरदचंद्र लोहोकरे यांची व्याख्याने झाली. व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू, डॉ श्रीराम कावळे होते. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात सदर व्याख्यानमाला घेण्यात आली.
दूरद्श्यप्रणालीद्वारे हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाकरिता प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक नवउपक्रम परिषदेचे समन्वयक तथा संचालक न.न.व.सा. डॉ. मनिष उत्तरवार यांनी परिश्रम घेतले.