शाळेतले पहिले पाऊल…

597

आपल्या मुलांनी नियमित शाळेत जावे आणि उत्तम शिक्षण घ्यावे ही आपल्या सर्वांची इच्छा असते. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून पालक शिक्षक आणि समाज या नात्याने आपणास त्यासाठी पोषक वातावरण तयार केले पाहिजे. म्हणूनच इयत्ता पहिली ची तयारी आपण करून घेऊया, चला तर मग मुलांसोबत मिळून काम करूया, आणि त्यांची शाळा पूर्वतयारी पक्की करून घेऊया. म्हणजे त्यांना पुढचे शिक्षण घेणे सोपे जाईल आणि त्यांची शिकण्याची गोडी वाढत जाईल.

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गडचिरोली जिल्ह्याची ओळख हा वनांनी व्याप्त, आदिवासीबहुल व मागासलेला, उद्योगधंदे नसलेला अशा प्रकारची आहे. गडचिरोली जिल्हा कडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणूनही आहे. त्यामुळेच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याची शैक्षणिक प्रगतीही मागे आहे असे बऱ्याच जणांना वाटते. आर्थिक प्रगतीमध्ये तर हा जिल्हा मागे आहेत, परंतु सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ही हा मागास असू शकतो, म्हणूनच आपण गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगती करिता सत्र 2022-23  या वर्षापासून  संपूर्ण महाराष्ट्राने राबवित असलेला एक उपक्रम म्हणजेच “शाळा पूर्वतयारी अभियान”. यातीलच शाळेतले पहिले पाऊल काय आहे? याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

शाळेतले पहिले पाऊल – वयाची सहा वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक पालक आपल्या पाल्याला गावातील शाळेमध्ये नाव दाखल करीत असतो. त्यासोबतच त्याला शिक्षणाची ओढ लागावी म्हणून त्याच्या आवडीचे नवे कपडे, नवी पुस्तके घेऊन देत असतो. दरवर्षी प्रमाणे विदर्भात 26 जूनला शाळा सुरू होते आणि शाळेतला पहिला दिवस उजाडतो. शाळेतला पहिला दिवसा सोबतच शाळा प्रवेशोत्सव साजरा केल्या जातो. यामध्ये विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन, नवीन कपडे आणि नवीन पुस्तके देऊन स्वागत स्वागत केले जाते. आणि त्याच्या शिक्षणाची औपचारिक सुरुवात केली जाते. परंतु सत्र 2022-23 मध्ये शाळापूर्व अभियान हा नवीन प्रकारचा उपक्रम महाराष्ट्र शासनाने लागू केल्यामुळे जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत शाळा पूर्व अभियान मेळावे आयोजित करणे आणि प्रत्यक्ष शाळापूर्व तयारी करून घेणे या गोष्टीवर भर देण्यात आला. या मध्येच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोळधा येथे  22- 23 या वर्षाकरिता 35 प्रवेशित विद्यार्थ्यांची शाळा पूर्व तयारी करण्याचा मानस ठेवला.   शासनाच्या निर्देशानुसार शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.

मी या शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्यात केंद्रस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम पाहिले असल्यामुळे, एकंदरीत शाळा पूर्वतयारी मेळावा कशाप्रकारे आयोजित करायचा याबद्दल बरीच कल्पना मला होती . गावामध्ये शाळापूर्व तयारी अभियानाची जाणीवजागृती करण्यापासून शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करणे, गावातील महिला मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक, उच्चशिक्षित व्यक्ती यांचेशी संपर्क साधणे, शाळा व्यवस्थापन समितीकडून मेळाव्याची तारीख निश्चित करणे, त्यानंतर प्रत्यक्ष मेळाव्या करिता ज्या विद्यार्थ्यांना आपण सामील करणार त्यांच्या पालकांचे उद्बोधन करणे अशा प्रकारची कामे सुरू झालीत. नियोजनाप्रमाणे शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये पस्तीस नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह बोलावण्यात आले. त्यांना शाळेतले पहिले पाऊल ही पुस्तिका सोबत आयडिया कार्ड आणि कृती पत्रिका वितरित करण्यात आले. शाळेचा संपूर्ण परिसर आज वेगळ्याच नवलाईने नटला होता.  विद्यार्थ्यांकरीता विविध खेळण्याचे साहित्य परिसरामध्ये सजवलेले होते. कुठे भित्तीपत्रिका, कुठे भित्तीचित्र तर कुठे रंगीत गाड्या,  विविध साधने घेऊन परिसर अगदी आनंददायी करण्यात आलेला होता. नियोजनाप्रमाणे शाळा पूर्वतयारी अभियानाचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.  प्रभात फेरी मध्ये विविध नारे देऊन नवप्रवेशित बालकांना आणि पालकांना शाळेमध्ये आमंत्रित करण्यात आले. क्षेत्राचे आमदार माननीय कृष्णाची गजबे साहेब हे प्रामुख्याने शाळा पूर्वतयारी अभियान मेळाव्याला उपस्थित होते. आपल्याच गावातील शाळेमध्ये विद्यार्थी कशाप्रकारे चांगले घडू शकतात यावर आमदार साहेबांनी मार्गदर्शन केलं. एकूण 35 बालकांना कृतीपत्रिका आयडिया कार्ड आणि शाळेतले पहिले पाऊल ही पुस्तिका प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रारंभिक चाचणी घेण्यात आली. चाचपणी करण्यात आली. त्यांच्या हाती त्यांचे विकास पत्र ठेवण्यात आले.  त्यानंतर विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी अर्थात शाळेतल्या पहिल्या पावला करिता त्यांची तयारी करून घेण्यात आली. नियोजनाप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपापली जबाबदारी स्वीकारली. सात स्टॉल लावण्यात आले होते. भाषा विकास, गणित विकास, सामाजिक, बौद्धिक विकास, शारीरिक विकास अशा प्रकारचा विकास तपासण्यात आला आणि उन्हाळ्यातले 12 आठवडे विद्यार्थ्यांच्या शाळा पूर्व तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्व शिक्षक मिळून अंगणवाडी सेविका गावातील तज्ञ मंडळी गावातील सुशिक्षित व्यक्ती यांची मदत घेण्यात आली. आणि बाराही आठवडे बारा कृतिपत्रिका, 12 आयडिया कार्ड आणि शाळेतले पहिले पाऊल,  प्रत्येक शिक्षक जाऊन विद्यार्थ्यांची वैयक्तिक रित्या भेट घेऊन त्यांची तयारी करून घेत होते. शाळेतले पहिले पाऊल कसे चांगल्या रीतीने, इच्छेने, आवडीने, हसत, आनंददायी होईल याकरिता विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेण्यात आली. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. अशा प्रकारचे उपक्रम होत राहिले पाहिजे. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे. याकरिता हा अतिशय स्तुत्य उत्तम उपक्रम आहे. याची फळे भविष्यात नक्कीच दिसतील.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मी स्वतः गायलेलं आणि संगीतबद्ध केलेले एक गीत सोनू तुझ्या शिक्षणाची रे आता तयारी करायची हाय…….. अतिशय आवडीचे गीत झाले. सर्व शाळांमधून हे गीत वाजवण्यात आलं. इंटरनेटवर तब्बल पंधरा हजाराहून जास्त लोकांनी याला बघितलं. विविध लोकांनी या गाण्याचा वापर करून डान्स बसवले, विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतली, एकंदरीत शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा सफल झाला. शाळेतले पहिले पाऊल विद्यार्थ्यांचे उत्तम राहिले आणि म्हणूनच मला म्हणावसं वाटतं की सोनू तुझ्या शिक्षणाची रे, आता तयारी करायची हाय….. आपणही हे गीत प्रवीण यादव या यूट्यूब चैनल ला भेट देऊन बघू शकता.

 लेखक- प्रविण यादव मुंजमकार

 शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोडधा

 पंचायत समिती देसाईगंज जिल्हा गडचिरोली

मोबाईल क्रमांक – 94 20 18 70 65

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here