शहरवासीयांच्या पुढाकारातून मुलचेरा शहर दारूविक्रीमुक्त

155

– नगरपंचायत व पोलिस विभागाचे सहकार्य
The गडविश्व
गडचिरोली, ९ सप्टेंबर : जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेले मुलचेरा शहर नगरवासियांच्या पुढाकारातून व पोलिस विभाग, नगरपंचायतच्या सहकार्याने संपूर्ण दारूविक्रीमुक्त झाले आहे. सध्यास्थितीत एकाही वार्डात दारूविक्री होतांना दिसत नाही.
मुलचेरा शहरातील वॉर्डा-वॉर्डात जवळपास १५ अवैध दारूविक्रेते सक्रिय होते. या दारूविक्रेत्यांच्या घराजवळ मद्यपींची रांग लागली असायची. यामुळे शहरातील व आजूबाजूच्या गावातील महिलांना त्रास सहन करावा लागत होता. अशातच गणेशोत्सव तोंडावर असतांना मुक्तिपथ तालुका चमूने केलेल्या आवाहनातून शहरातील अवैध दारू हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने शहरातील गणेश मंडळ, वॉर्ड संघटना, शहरसंघटना व नगरवासीयांनी वॉर्डावॉर्डात बैठका घेऊन दारूविक्री बंदीचा ठराव घेतला. सोबतच दारूविक्री करणाऱ्यांकडून १० हजारांचा दंड वसूल करण्याचाही निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, या बैठकांमध्ये शहरातील दारूविक्रेत्यांना सुद्धा बोलावून अवैध व्यवसाय बंद करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. त्यानुसार शहरातील दारूविक्रेत्यांनीही शहरवासीयांच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आपला अवैध व्यवसाय बंद केला आहे. दरम्यान, शहरातील एका मुजोर विक्रेत्यांनी शहरवासीयांच्या निर्णयाचे उल्लंघन करीत अवैध दारूविक्री करण्यास सुरवात केली. याबाबतची माहिती मिळताच मुक्तिपथ तालुका चमू व वॉर्ड संघटनांनी दारूविक्रेत्याकडून अवैध दारू जप्त करीत दंड भरण्याची समज दिली. मात्र, सदर दारूविक्रेता ऐकायला तयार नसल्यामुळे त्याला मुद्देमालासह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यामुळे इतरही मुजोर विक्रेत्यांनी निर्णयाचे पालन करीत शहरवासीयांना सहकार्य केले. आताच्या घडीला मुलचेरा शहर पूर्णपणे दारूविक्री मुक्त झाले आहे. यासाठी पोलिस विभाग व नगरपंचायतने वेळोवेळी सहकार्य केले. यामुळेच मुलचेरा शहरातुन अवैध दारू हद्दपार झाली आहे. सध्या स्थितीत शहरातील संपूर्ण वार्डातील अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद आहे. गणेश मंडळ, वॉर्ड संघटना शहर संघटना व मुक्तिपथच्या प्रयत्नांना यश आले असून मुक्तिपथ वार्ड व शहर संघटने मध्ये व नागरिकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here