The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : जिल्ह्यातील ‘सर्च’ मधील माँ दंन्तेश्वरी दवाखान्यात ६ ऑगस्ट रोजी आयोजित वेदना व्यवस्थापन ओपिडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या ओपीडीच्या माध्यमातून १३३ रुग्णांची तपासणी मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन व त्यांच्या टीमने केली.
या ओपीडीमध्ये पाठीचा कणा दुखणे ,पाठदुखी, स्लिपडिस्क, मज्जा तंतूवेदना, लंबरस्पॉन्डिलायसिस, सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्तवेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस, डोक्याच्या मागील बाजूस डोके दुखी होणे या सर्वांचा उपचार होईल. या ओपीडीमध्ये पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा आणि अवघडलेपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, वक्षीय स्पॉन्डिलायसिस मागे वाकताना पाठीच्या मध्य भागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे, टाचेच्या वेदना आणि कर्करोग वेदना या सर्व प्रकारच्या आजारावर उपचार करण्यात आला. ज्या रुग्णांना वेदनेचा खूप त्रास होता अशा रुग्णांना पेनब्लॉक देण्यात आले व काही रुग्णांना फिजिओथेरफीचा उपचार देण्यात आला. ही ओपीडी पुढील महिन्याच्या पहिल्या शनिवारी होईल व या वेदना व्यवस्थापन ओपिडीचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना नोंदणी करण्याचे आवाहन सर्चने केले आहे.