वीज कोसळून तिघांचा मृत्यु, एकजण जखमी

1011

– शेळ्याही ठार, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील घटना
The गडविश्व
चंद्रपूर /नागपूर, ३ ऑगस्ट : चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात आज बुधवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून तिघांचा मृत्यू , तर एक जण जखमी झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. तर काही शेळ्याही ठार झाल्याचे कळते.
भद्रावती तालुक्यातील एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या चिचोर्डी शेतशिवारात पाळीव जनावरे राखत असलेल्या गुराख्यावर अचानक आलेल्या पावसात वीज कोसळली. यात त्याचा मृत्यू, तर एक जण जखमी झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. संजय काशिनाथ चालखुरे (५५), रा. बरांज, मोकासा असे वीज पडून मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव आहे. विकास डाखरे (३०), रा. बरांज, मोकासा असे जखमीचे नाव आहे.
तर जिवती तालुक्यातील शेडवाही (लांबोरी) येथील तरुण शेतकरी अनिल सोयाम या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून मृत्यू झाला. तसेच तेथे असलेल्या त्यांच्या सात शेळ्याही ठार झाल्याचे कळते.
तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सातनवरी (पादरी खापा) शिवारात वीज कोसळल्याने होरपळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उज्ज्वला सुरेश थुटूरकर (४०), रा. सातनवरी, ता. नागपूर, ग्रामीण असे मृतक या महिलेचे नाव आहे.
आज अचानकपणे चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्याततील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच विजांचा कडकडाट सुद्धा होता. या दरम्यान चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या घटनेने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here