The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील विहिरीगाव जंगलपरिसरात गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने गुरुवारी संयुक्त कृती करीत जवळपास ५४ हजार रुपये किमतीचा सात क्विंटल मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केले.
विहीरगाव गावात जवळपास चार वर्ष अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, मागील एक वर्षांपासून गावात दारूविक्रीचा अवैध व्यवसाय सुरु झाला. गावात काही दारूविक्रेते सक्रिय असून जवळपासच्या गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी विहीरगाव येथे येत असतात. तसेच येथील ठोक विक्रेते गडचिरोली शहरातील विक्रेत्यांसह परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करतात.
गावातील विक्रेत्यांनी जंगलपरिसरात मोहफुलाचा सडवा टाकून हातभट्ट्या लावल्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गाव संघटन सदस्यांनी व मुक्तिपथ तालुका चमूने अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्याअनुषंगाने जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली असता, जवळपास चार ठिकाणी सात क्विंटल मोहफुलाचा सडवा व दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्य आढळून आले असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.