– परिसरात भितीचे वातावरण, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्हयातील ब्रम्हपूरी तालुक्यातील बोडधा येथे वाघाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. कवडू किसन मेश्राम (५५) रा. बोधडा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक शेतकरी कवडू मेश्राम हे काल रविवारी गावात असलेले लग्न कार्य आटोपून दुपारच्या सुमारास बोडधा येथील अमराई नदी घाटावर बैल धुवायला गेले. संध्याकाळी बैल घरी परत आले मात्र ते परत न आल्याने गावकऱ्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र ते कुठेही आढळून आले नाही. आज पहाटेच्या सुमारास पुन्हा गावकऱ्यांनी शोध कार्य सुरू केले असता वैनगंगा नदी घाटाला लागून असलेल्या बंडू पाटील ठाकरे यांच्या शेतात त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न असस्थेत आढळून आला. त्याचे मृत शरीर बघून वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले व आपला भक्ष बनवल्याचे निश्पन्न झाले. सदर घटनेची माहीती वनविभागाला दिली असता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना केली.
