THE गडविश्व
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतात विवाहसंस्थेचे महत्व अधिक आहे. लग्नानंतर आयुष्यभर एकमेकांच्या सुख दुख:त सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या जातात. नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास असणे हा नात्याचा कणा मानला जातो. जर विश्वासघात केला किंवा धोका दिला तर नात्याला ग्रहण लागलच म्हणून समजा. अशात आता दिल्ली हायकोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने एका प्रकरणात निकाल सुनावताना म्हटले आहे की, लग्नाआधी पती किंवा पत्नीकडून त्यांना असलेल्या आजाराबद्दल माहिती न देणे धोका आहे. आणि असे असेल तर हे लग्न रद्द होऊ शकते, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने कौटुंबिक न्यायालयाचा एक आदेश रद्द करत एका व्यक्तिचे लग्न रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने हे लग्न रद्द करत म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीची चूक नसेल तर कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ शकतो.
कोर्टाने म्हटले आहे की, या प्रकरणातील महिलेने मान्य केले आहे की, तिला कॉलेज वयापासून डोकेदुखीचा त्रास होता, त्यामुळे तिचे शिक्षण बंद झाले. खंडपीठाने असेही म्हटले की, डोकेदुखी मोठा आजार नाही. हे केवळ एखाद्या आजाराचे लक्षण आहे. मात्र महिलेने हे सांगितले नाही की, तिला गंभीर आणि सततची डोकेदुखी होती. त्यामुळे तिला शिक्षण सोडावे लागले. कोर्टाने म्हटले आहे की, मानसिक आजाराने पीडित असलेल्या व्यक्तिच्या मुलांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. लग्नाच्या जवळपास ९ आठवड्यानंतर या महिलेच्या वडिलांनी तिला आपल्या घरी नेले होते.
खंडपीठाने म्हटले आहे की, या सर्व प्रकरणात दुर्देवी पद्धतीचे पतीचे आयुष्य त्रासदायक झाले. तो नाहक गेल्या १६ वर्षांपासून या नात्यात अडकून पडला आहे. जीवनाच्या सर्वात महत्वाच्या काळात याचिकाकर्त्याला वैवाहिक आनंद मिळू शकला नाही. महिलेच्या हट्टापायी त्याला त्रास सोसावा लागला यामुळे कोर्टाने सदर महिलेला १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
