– पोलीस दलात निवड झालेल्या आकाश गावडे या विद्यार्थ्याची यशोगाथा
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस भरतीचा निकाल नुकताच लागला. यात ‘लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी’ मध्ये लक्ष्य वेधण्याचे धडे घेणाऱ्या बरेचश्या विद्यार्थ्यांची निवड झाली. या भरतीत निवड झालेल्या आकाश गावडे यांनी आपली यशोगाथा सांगताना आपले मत व्यक्त करतांना सांगितले कि ‘लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी’ मधून ‘लक्ष्य वेधण्याचे’ अचूक धडे, मार्गदर्शन मिळतात. पुढे आपली यशोगाथा सांगताना सांगितले…..

मी,
आकाश सुरेश गावडे मु. रेगडी पोस्ट. रेगडी ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली. माझे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण रेगडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुलचेरा येथील वीर बाबुराव शेडमाके येथे आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी मी बाहेर जाण्याचे ठरविले आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील “टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात खडकी येथे बी.ए. करिता प्रवेश घेतला” आणि पुणे शहरात शिक्षणासाठी व अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या संगतीत राहू लागलो. त्यात मला कळलं की जर आपल्याला सरकारी नौकरी पाहिजे असेल तर कठोर परिश्रम घ्यावे लागतील. शहरातील मुले- मुली दहा-दहा बारा- बारा तास अभ्यास करायचे. आणि मी गावाकडून आलेला मुलगा आणि सुरुवातीपासूनच अभ्यासात रुची नसलेला मुलगा तरीपण सुरुवात झालीच आहे हळूहळू मन लागेल या विचारात अभ्यास सुरू केलं. काही महिने व्यवस्थित अभ्यास सुरू होता पण बाबा शेतकरी. घर सांभाळू की मुलाला पैसे पुरवू अशी परिस्थिती यायला लागली. हळूहळू अडचणी वाढतच गेल्या. पैसा नाही म्हणून मी एक -दोन महिने जॉब करायचा आणि नंतर जॉब सोडला की अभ्यास करायचा. परत-परत तेच करायला जमत नव्हते म्हणून मला बाबांनी सांभाळलं, घरी खायला नसेल तरी चालेल पण मी तुला पैसे पुरवतो असे सांगून बाबा मला लागतील तेव्हा यांना-त्यांना उधार उसने वारी पैसे मागून द्यायचे. घरात पैसा आहे की नाही याचा विचार न करता मला महिन्याला दोन ते तीन हजार रुपये पाठवू लागले. मी वस्तीगृहात राहत असल्यामुळे रूम भाडे लागत नव्हते. तरी पण पुण्यासारख्या मोठ्या शहरात दोन ते तीन हजार रुपयात महिना काढणे अवघडच होते. माझ्या मोठ्या वडिलांचा मुलगा अक्षय गावडे आणि माझे जिवलग मित्र अजय पोटावी आणि तुषार उसेंडी यांनी मला कुठल्याही अडचणीत कोणत्याही परिस्थितीत मला मदत करायला समोर येत होते. कसेबसे तीन वर्ष काढले त्यानंतर गावाला परत जावं वाटत होतं पण तीन वर्ष पुण्याला शिक्षण घेऊन गावाला परत जाणे मला योग्य वाटले नाही म्हणून मी एम. ए करण्याकरिता बाबुराव घोलप महाविद्यालय नवी सांगवी येथे राज्यशास्त्र या विषयाकरिता प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली.
हळूहळू सगळं व्यवस्थित चालत असतानाच कोरोना या विषाणू ने जगभर थैमान घातले आणि सगळेच ठप्प झालं माझ्याकडे पर्याय नव्हता मला पुणे सोडावे लागले आणि गावाला आलो. गावात आल्यानंतर लोकांच्या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. लोक मजा घ्यायची, पुण्यासारख्या शहरात शिकून याच्याकडे जॉब किंवा नोकरी नाही, हे मुलं बाहेर शिकायला नाही तर मजा करायला जातात, घरचे पैसे उडवतात, पार्ट्या करतात. अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागत होत्या, मी गावाकडे असताना माझी ओळख रेगडी येथील पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले P.S.I शिब्रे सर यांच्याशी झाली आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. त्यांनी मला गडचिरोली येथील पोलीस पूर्व प्रशिक्षणास पाठविले व मी 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात पोलीस पूर्व प्रशिक्षणासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे हजर झालो. त्या एका महिन्यात सराव करताना मी स्पर्धेत टिकू शकतो ही भावना मनात निर्माण झाली. प्रशिक्षणात असतानाच माझी ओळख कपिल आकुदर या मुलाशी झाली जो राजाराम खांदला (अहेरी) येथून आलेला होता. म्हणतात ना, “यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द हे मित्र वाढवतात आणि मित्र हे भाग्याने मिळतात” असाच माझ्या जीवनात भाग्य घेऊन आलेला मित्र म्हणजे कपिल त्याच्या गोड स्वभावामुळे त्याच्याजवळ गेलो आणि त्याची प्रामाणिक वागणूक हे माझ्यासाठी भाग्यच होते. त्यांनी मला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढले. त्याच्यासोबत असतानाच त्यांनी मला लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी गडचिरोली बद्दल माहिती दिली. आणि लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक मा. राजीव खोबरे सर यांच्याशी ओळख करून दिली. राजीव सर व नंदनवार सर हे गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत असल्याचे कळाले. व मी सरांच्या “लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी” मध्ये मोफत शिक्षण घेण्यास सुरुवात केली राजीव सरांच्या शिकवणीमुळे प्रत्येक विषयातील उदाहरणे सोडवण्याचा आत्मविश्वास मिळाला आणि माझे भाग्य पलटले राजीव सरांनी दिलेल्या प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम मी पूर्ण करत गेलो आणि सरांचे Task पूर्ण करता- करता मलाच कळाले नाही की मी स्पर्धेतल्या पुढच्या दहा विद्यार्थ्यात माझी निवड होऊ शकते. सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे शिकत राहण्याची आवड निर्माण होत होती. आणि मी शिकत राहिलो सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे माझी नुकतीच गडचिरोली पोलीस दलात “पोलीस शिपाई “या पदावर निवड झालेली आहे. प्रा. राजीव सर व प्रा. नंदनवार सर यांनी मला स्पर्धा परीक्षेतील Warrior म्हणून नावारुपास आणले. नक्कीच लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीमधून लक्ष्य वेधण्याचे अचूक धडे मिळतात हे तेवढेच खरे. आज पर्यंतच्या प्रवासात मला वेळोवेळी साथ दिलेले माझे आई-वडील, माझी ताई सपना, माझा मोठा भाऊ आकाश गावडे माझे जिवलग मित्र अजय पोटावी तुषार उसेंडी कपिल आकुदर यास माझे धन्यवाद. लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी चे प्रा. राजीव सर प्रा. नंदनवार सर आणि ‘The गडविश्व’ चे संपादक सचिन जिवतोडे सर मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद…
-आपलाच
आकाश सुरेश गावडे, पोलीस शिपाई 2019
#Lakshyavedh Academy Gadchiroli #Akash Gawadhe #Pro. Rajiv sir #Pro. Nandnwar Sir #Gadchiroli