– गडचिरोली पोलीस भरती २०२२ मध्ये निवड
– निखिल ची यशोगाथा
माझे नाव निखिल खुशाल राऊत मु. उसेगाव, पो.आंबेशिवणी, ता. जि. गडचिरोली
माझे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण उसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर पुढील शिक्षण आंबेशिवणी येथे झाले. मी एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून मी शिक्षणाबरोबरच आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करत होतो. मला नांगर पकडणे, बैल चारणे, बैलाला लागणारे साहित्य बनविणे उदा. दावे, कानोसे, वेसन इत्यादी साहित्य बनविण्याचा मला लहानपणापासूनच छंद होता.
मी सातवीमध्ये शिकत असताना एक शेळी विकत घेतली आणि तिचे योग्यरित्या पालन पोषण करून त्या एका शेळीपासून उत्पन्न मिळत गेले व वीस ते पंचवीस शेळया झाल्या. या दरम्यान मी शाळेला खंड न पाडता शेळ्या राखायला तसेच बैल चारायला जात होतो. शाळेबद्दल बोलायचे झाल्यास मी शाळेतील सर्वात ‘ढ’ विद्यार्थी होतो. मला व्यवस्थित मराठी सुद्धा वाचता येत नव्हती कसे तरी करून दहावीला मला ५१.८० टक्के गुण मिळाले तर बारावीला विज्ञान हा विषय घेऊन ४४ टक्के गुण मिळाले. यावेळी मी पास झालो याचाच मला खूप आनंद होत होता. कारण मला वाचता येत नसल्याने मला जास्त गुण मिळवता आले नाही. बारावी पास झाल्यानंतर पुढे काय करायचे हे मला कळत नव्हते माझे भविष्य काय असणार याचा सतत विचार येत होता. आई-वडील शेतकरी भाऊ पण शेतकरी आणि मरेपर्यंत मला पण शेतीच करावी लागेल हा विषय सतत डोक्यात घर करत होता. मी भविष्याचा विचार करत असताना मला पोलीस भरती बद्दल माहिती मिळाली आधीच मी काठावर पास झालेला विद्यार्थी त्यामुळे मोठ्या पदाची तयारी करता येणार नाही आणि ते मला झेपणार नाही असा माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झालेला होता. म्हणून काही का असेना पोलीस भरती ची तयारी करण्याचे ठरविले व २०१८ -१९ मध्ये माझ्या घरच्या असलेल्या शेळ्या विकून गडचिरोली ला राहायला आलो आणि येथे आल्यानंतर शारीरिक चाचणीची तयारी करताना पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महेश बोईनवार याच्याशी मैत्री झाली त्यानंतर महेश बोईनवार या मित्राकडून “लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी” बद्दल मला माहिती मिळाली व महेश बोईनवार या मित्राने मला “लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे” संचालक प्राध्यापक राजीव सर यांच्याशी भेट घालून दिली व सरांना माझी आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्यानंतर सरांनी मला स्पर्धा परीक्षेची फी न स्वीकारता मला अकॅडमी मध्ये प्रवेश दिला व मी पोलीस भरतीची तयारीला सुरुवात केली. हळूहळू मला रविवारच्या सराव पेपरला ३० ते ३५ गुण मिळायला सुरुवात झाली. नंदनवार सरांकडे मी शारीरिक चाचणीची तयारी करायला लागलो. सरांनी सांगितलेला वर्कआउट पूर्ण करत गेलो व माझे एक-एक इव्हेंट चांगल्या प्रकारे बनू लागले. २०१९ मध्ये भरती न झाल्याने मी गावाकडे येऊन आंबेशिवनी येथे वाचनालय सुरू केले आणि माझ्यासोबतच आणखी चार ते पाच मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. मी गावाकडे अभ्यासाची तयारी करताना राजीव सरांनी सांगितलेल्या अभ्यासक्रमानुसारच मी अभ्यास करत राहिलो तसेच शारीरिक चाचणीच्या बाबतीत मी प्राध्यापक नंदनवार सरांचा खूप प्रिय विद्यार्थी होतो. २०० मुला-मुलींमधून मी सर्वात वेगवान विद्यार्थी होतो. नंदनवार सर माझ्यावर खूप विश्वास टाकायचे त्यांनी दिलेले प्रत्येक प्रिंटआउट मी मारायचो. २०१९ ची जिल्हा पोलीस भरती २०२२ मध्ये घेण्यात आली यात मला पेपरला ९१ गुण मिळाले व शारीरिक चाचणीमध्ये ५० पैकी ४७ गुण मिळाले आणि एकूण १३८ गुण मिळवत माझी गडचिरोली पोलीस दलात निवड झाली.
सध्या मी माझ्या गावात असलेल्या तसेच गावाशेजारी असलेल्या मुलांना पोलीस भरती बद्दल मार्गदर्शन करीत आहे. माझ्या या यशात माझे आई- वडील, माझा मोठा भाऊ, वहिनी, तसेच माझी ताई यांचे श्रेय आहे. तसेच “लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजीव सर व नंदनवार सर तसेच The गडविश्वचे संपादक सचिन जिवतोडे सर यांनी माझे मनोगत व्यक्त करण्याकरिता मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.
आपलाच
निखिल खुशाल राऊत
गडचिरोली पोलीस शिपाई २०२२