– निवेदनातून विविध मागण्या
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील सर्व पाण्याच्या जलकुंभाभोवती कंपाऊंड भिंती बांधण्यात याव्यात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टाकीच्या ठिकाणी पहारेकरी तैनात करून कडक सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वाघ यांच्याकडे केली आहे. पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन दिले.
पिण्याचे पाणी हा अत्यंत महत्त्वाचा व गंभीर प्रश्न असून मनपा प्रशासनाने तो अत्यंत संवेदनशीलपणे हाताळावा, असे मुख्याधिकारी वाघ यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले. शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या बंदोबस्ताचीही मागणी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सर्व आवश्यक माहिती शिष्टमंडळातील सदस्यांना दिली.
पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या सर्व पाण्याच्या टाक्या व पाईप लाईन पूर्णपणे स्वच्छ करून मगच रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरवठा करावा, अशी सूचना निवेदनात करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यात मानवी शरीर आणि मानवी मांसाचे तुकडे सापडल्याच्या घटनेनंतर रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शिष्टमंडळात प्रदेश महिला उपाध्यक्षा सुरेखाताई बारसागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रकाश दुधे, ज्येष्ठ आदिवासी नेत्या कुसुम आलाम, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, शहराध्यक्ष अनिल बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते विलास निंभोरकर, जिल्हा युवा सचिव पुण्यवन आदी उपस्थित होते.