राज्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम ; राज्य शासनाच्या सर्वसाधारण सूचना जारी

635

The गडविश्व
मुंबई, ३० जुलै : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांसाठी सर्वसाधारण सूचना जारी केल्या आहेत.
‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसार, प्रचार व जाणीव जागृती मोहिमेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, जाहिराती, लघु चित्रपट, सेलिब्रिटीच्या माध्यमातून आवाहन, पोस्टर इ. याची निर्मिती केली आहे. ती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर याबाबतची माहिती कोणत्याही विभागास / नागरिकाला उपलब्ध होऊ शकते. त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यात यावा. ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांना सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या असून याबाबतचे शासन परिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here